लखनौ : भारतीय रेल्वेच्या अनेक गोष्टी कहाण्या दंतकथाप्रमाणे ऐकायला मिळतात. कधी जखमी झालेल्या प्रवाशाच्या मदतीसाठी माघारी आलेली एक्स्प्रेस, तर गरजवांताना झालेली मदत. अगदी अशीच चित्तथरारक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. अपहरण करण्यात आलेल्या एका तीन वर्षांच्या चिमुकलीच्या सुटकेसाठी राप्तीसागर एक्स्प्रेस रेल्वेगाडी सलग २४० किमी धावली. कुठेही थांबा न घेता धावलेल्या या गाडीमुळे चिमुकलीची सुटका करणे शक्य झाले. पण, दुर्दैवी बाब म्हणजे अपहरण करणारा व्यक्ती त्या चिमुकलीचा बापच निघाला.
उत्तर प्रदेशातील ललितपूर रेल्वे स्थानकात सोमवारी एक महिला रेल्वे पोलिसांकडे आली. एका व्यक्तीने आपल्या तीन वर्षांच्या मुलीला जबरदस्तीने उचलून नेल्याचे सांगितले. ती व्यक्ती रेल्वे गाडीत बसली असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर सुरू झाला आरोपीचा पाठलाग. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यात व्यक्ती मुलीला घेऊन राप्तीसागर एक्स्प्रेसमध्ये बसल्याचे दिसले. ही गाडी काही वेळापूर्वीच रेल्वेस्थानकातून रवाना झालेली होती. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी याची माहिती झाशी रेल्वे स्थानकावर असलेल्या पोलिस निरीक्षकाला याची माहिती दिली. त्यांनी अपहरण करणारी व्यक्ती फरार होऊ नये म्हणून भोपाळच्या नियंत्रण कक्षाला रेल्वेगाडी विनाथांबा सोडण्याची विनंती केली. त्यानंतर ललितपूर रेल्वे स्थानकावरून सुटलेली ही गाडी कुठेही न थांबता सलग भोपाळपर्यंत २४१ किमी धावत होती.
अपहरणकर्ता निघाला मुलीचा पिता
अखेर भोपाळ जंक्शनवर पोहोचल्यानंतर राखीव पोलिस दलाचे जवान, रेल्वे पोलिस आणि रेल्वे अधिकाºयांनी मोठ्या शिताफीने अपहरण कर्त्याला ताब्यात घेत चिमुकलीची सुटका केली. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीत आरोपी हाच मुलीचा बाप असल्याचे समोर आले, अशी माहिती ललितपूरचे पोलिस अधीक्षक एम.एम. बेग यांनी दिली.
पती-पत्नीच्या भांडणातून घडला प्रकार
पोलिसांनी सांगितले की, आरोपीचे पत्नीशी भांडण झाले होते़ त्यानंतर तो मुलीला घेऊन घराबाहेर पडला. त्यांचे घर ललितपूर स्टेशन परिसरातच आहे. आपल्या मुलीला पतीनेच नेल्याची माहिती त्या महिलेला असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सौदीने भारताच्या नकाशातून जम्मू-काश्मीर वगळले ; भारताकडून संताप व्यक्त