नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेला उत्तर प्रदेशपासून तेलंगणापर्यंत १३ राज्यांमध्ये विरोध होत आहे. याचा सर्वाधिक परिणाम बिहारमध्ये दिसून येत आहे. सैन्य भरतीची तयारी करणारे रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करत आहेत. बस-रेल्वे फोडल्या जात आहेत. रस्ते जाम केले जात आहेत. पोलिस-प्रशासनाशी संबंधित लोकांवर दगडफेक केली जात आहे.
त्यातच आता केंद्रीय गृहमंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत सेवेत ४ वर्षे पूर्ण करणा-या अग्निवीरांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ) आणि आसाम रायफल्समधील भरतीसाठी १० टक्के रिक्त जागा राखीव ठेवण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला आहे.
अग्निवीरांना दोन दलात भरतीसाठी उच्च वयोमर्यादेपेक्षा ३ वर्षे वयाची सूट दिली जाईल. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीसाठी उच्च वयोमर्यादेच्या पुढे ५ वर्षांसाठी वयोमर्यादा शिथिल असेल, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे. केंद्र सरकारने लष्करभरतीसाठी नुकत्याच जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत नव्याने भरती होणा-यांसाठी प्रवेशाची वयोमर्यादा १७ वर्षे ६ महिने ते २१ वर्षे अशी निश्चित करण्यात आली होती.
परंतु, गेली दोन वर्षे लष्करात भरती प्रक्रिया सुरू करणे शक्य झाले नसल्याची दखल घेत, सरकारने २०२२ साठी प्रस्तावित लष्कर भरतीसाठी वयामध्ये यंदा सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २०२२ अग्निपथ योजनेतील भरती प्रक्रियेसाठी उच्च वयोमर्यादा २३ वर्षे अशी करण्यात आली आहे.