नवी दिल्ली : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदच्या पाँडेचेरी इथल्या संशोधन केंद्रात एक अनोखे संशोधन झाले. डासांना मारणा-या विषाणूच्या एका प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. हा विषाणू इतर कोणत्याही प्राण्याला इजा न पोहोचवता डास आणि काळ्या माश््यांची अंडी नष्ट करतो.
हा बीटीआय प्रजातीचा विषाणू पर्यावरण आणि इतर प्राण्यांना कोणतीही इजा करत नाही. डास मारण्यासाठी हा विषाणू अनेक वर्षांपासून वापरला जात आहे. या संशोधन केंद्राचे संचालक डॉ. अश्वनी कुमार यांनी या संशोधनाविषयी माहिती दिली आहे. ते म्हणाले, विषाणूच्या या प्रजातीची पूर्णपणे चाचणी केलेली आहे आणि तिला आता भारतीय प्रजातीचा दर्जाही दिला आहे. आत्तापर्यंत या तंत्रज्ञानाचा परवाना २१ कंपन्यांना देण्यात आला आहे.
भारत सध्या चिकनगुनिया, मलेरिया, फिलारियासिस, डेंग्यू, झिका अशा डासांपासून होणा-या आजारांशी लढत आहे. या विषाणू तंत्रज्ञानाचा शोध हे या लढाईतले मोठे पाऊल ठरणार आहे. गेल्या महिन्यात केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी हे बीटीआय तंत्रज्ञान हिंदुस्तान इनसेक्टिसाईड्सकडे व्यावसायिक उत्पादन आणि वापरासाठी सोपवण्यात आले आहे.
संसर्गजन्य आजारांपैकी १७ टक्के आजार हे डासांमुळे होतात. ज्यामुळे वर्षाला सात लाख मृत्यू होतात. बीटीआयÞ तंत्रज्ञानाचे बाजारमूल्य सध्या भारतात वार्षिक एक हजार कोटी रुपये इतकी आहे. मे महिन्यापर्यंत यंदाच्या वर्षी देशात १०,१७२ डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत, तर तिघांचा मृत्यू झाला आहे. जून महिन्यापर्यंत चिकनगुन्याचे १,५५४ रुग्ण आढळले आहेत. तर एप्रिलपर्यंत २१,५५८ जणांना मलेरिया झाला असून चौघांचा मृत्यू झाला आहे.