सिमला : हिमाचल प्रदेशातील अनेक भागांत आजही रस्ते नाहीत. राज्याचे शिक्षणमंत्री रोहित ठाकूर यांच्या जुब्बल कोटखाई मतदार संघाचीही अशीच दुरवस्था आहे. येथील एका गरोदर महिलेला नागरिकांनी खुर्चीला बांधून रुग्णालयात पोहोचवल्याचा एक व्हीडीओ व्हायरल झाला आहे.
या व्हीडीओत काही नागरिक एका महिलेला खुर्चीला बांधून जवळपास ३ किमी लांबीवरील हमरस्त्यावर नेताना दिसून येत आहे. जुब्बल-कोटखाई विधानसभा क्षेत्रातील कुडू पंचायतीच्या नडाल गावाला रस्ता नाही. परिस्थिती एवढी खराब आहे की, एखाद्या आजारी किंवा गर्भवती महिलेला पालखीत बसवून रुग्णालयात न्यावे लागते. शनिवारीही गावातील एका गरोदर महिलेला आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात नेण्यासाठी ग्रामस्थांना मोठी धडपड करावी लागली. त्यांनी गरोदर महिलेला खुर्चीला बांधून जवळपास ३ किमीपर्यंत पायी खांद्यावर नेले.