नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनी घडलेल्या एका घटनेनंतर लोकां सांगे ब्रह्मज्ञान या म्हणीचा वेगळ्या पद्धतीने अनुभव आला. राजस्थानमधील एका कार्यक्रमात पोलिस उपाधिक्षकांनी भ्रष्टाचाराविरोधात मारे जोरात भाषण केले खरे पण अवघ्या तासाभरात त्यांनाच लाचखोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली.
माधोपूरमध्ये अँटी करप्शन ब्युरोच्या (एसीबी) कार्यालयात आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डीएसपी मीणा हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. मीणा यांनी या ठिकाणी उपस्थितांना संबोधित करताना भ्रष्टाचाराविरोधात जोरदार भाषण केले. आपल्याला संपूर्ण प्रामाणिकपणे भारताला भ्रष्टाचारापासून मुक्त करायचे आहे. केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही कर्मचा-याने लाच मागितली तर १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही मीणा यांनी लोकांना केले. त्यांच्या भाषणाने उपस्थितांना चांगलीच प्रेरणा मिळाली इतके ते प्रभावी झाले होते. मीणा यांच्या स्वच्छ कारभाराचा जणू आरसाच त्यांच्या भाषणातून जाणवत होता. पण नंतर भलतेच झाले.
भाषणानंतर तासाभरात लाचखोरीच्या आरोपात अटक
डीएसपी मीणा यांना भाषणाच्या एक तासानंतर तब्बल ८० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तसेच त्यांना लाच देणा-या जिल्हा परिवहन अधिका-यालाही अटक झाली आहे. एसीबीच्या कार्यालयात असलेल्या आयपीएस दर्जाच्या अधिका-याला अनेक प्रयत्नांनंतर डीएसपी मीणा यांच्याविरोधात पुरावे मिळाले होते. या पुराव्यांच्या आधारे एसीबीची टीम आणखी काही अधिका-यांविरोधात गुन्हा दाखल करु शकते. एसीबीचे महासंचालक बीएल सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोटा येथील आकाशवाणी कॉलनीत राहणा-या डीएसपी भैरुलाल मीणा हे सवाई माधोपूरमधील एसबी पोलीस ठाण्याचे प्रभारी आहेत.
त्यांच्याविरोधात अनेक दिवसांपासून तक्रारी येत होत्या. एसबी चौकात अधिका-यांना बोलावून ते पैसे घेत असत. त्यामुळे एसीबीची टीम सातत्याने त्यांच्यावर लक्ष ठेवून होती. बुधवारी या चौकात एसीबीची टीम पोहोचली तेव्हा करौली येथील दलपूरा येथे राहणारे डीटीओ महेशचंद मीणा त्यांना मासिक हफ्त्याचे ८० हजार रुपये देत होते. दरम्यान डीएसपी मीणा यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर एसीबीच्या टीमला जमिनींची कागदपत्रे आणि १.६१ लाख रोख रुपये आढळून आले. आता एसीबीची टीम त्यांच्या अन्य ठिकाणांचा शोध घेत आहे अशी माहिती अधिका-यांनी दिली आहे.