25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीय१ सप्टेंबरपासून टोलटॅक्समध्ये होणार वाढ

१ सप्टेंबरपासून टोलटॅक्समध्ये होणार वाढ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : २ दिवसांनी नवीन महिना म्हणजेच सप्टेंबर सुरू होणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासून आपल्या आयुष्यावर परिणाम करणा-या अनेक गोष्टी आणि नियमांमध्ये बदल होणार आहे. बँकिंग नियम, एलपीजीच्या किमतींमध्ये बदल होऊ शकतो. यासोबतच टोल टॅक्सही वाढणार आहे. त्याचा फटका वाहनधारकांना बसणार आहे. दरम्यान, नवीन महिना सुरू होण्यापूर्वी शेतक-यांनी पंतप्रधान किसान योजनेशी संबंधित कामांचा निपटारा करणेही आवश्यक आहे. १ सप्टेंबरपासून यामध्ये बदल होणार आहे. त्यामुळे राहिलेली कामे त्वरीत पूर्ण करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

१ सप्टेंबरपासून टोल टॅक्सही वाढणार आहे. त्यामुळे जर दिल्लीला जाण्यासाठी यमुना एक्सप्रेस वेचा वापर करत असाल तर १ सप्टेंबरपासून अधिक टोल टॅक्स भरावा लागणार आहे. नवीन भाडेवाढीनुसार कार, जीप, व्हॅन आणि हलकी मोटार वाहनांसाठी टोल दर प्रतिकिमी २.५० रुपयांवरून २.६५ रुपये करण्यात आला आहे. अर्थात प्रतिकिलोमीटर १० पैशांची वाढ झाली आहे. हलकी व्यावसायिक वाहने, हलकी मालवाहू वाहने किंवा मिनी बससाठी टोल टॅक्स ३.९० रुपये प्रतिकिमीवरून ४.१५ रुपये प्रतिकिमी करण्यात आला आहे. बस किंवा ट्रकचा टोल दर ७.९० रुपये प्रतिकिमीवरून ८.४५ रुपये प्रतिकिमी करण्यात आला आहे. यापूर्वी २०२१ मध्ये यमुना एक्सप्रेस वेच्या टोल टॅक्समध्ये वाढ करण्यात आली होती.

पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना ब-याच काळापासून अपडेट करण्यास सांगत आहे. केवायसी अपडेट करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट असल्याचे बँकेने स्पष्टपणे सांगितले आहे. बँकेने ट्विट करून ग्राहकांना कळवले असून, रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व ग्राहकांनी केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी बँकेने ३१ ऑगस्ट २०२२ ही अंतिम तारीख निश्चित केली आहे.

बँकेच्या म्हणण्यानुसार जर तुमचे खाते ३१ मार्च २०२२ पर्यंत केवायसी अपडेट केले नसेल तर ते ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करा. केवायसी अपडेट करण्यासाठी मूळ शाखेशी संपर्क साधा. जर तुम्ही केवायसी अपडेट केले नसेल, तर तुम्ही तुमच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर करू शकणार नाही.

पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतीत बदल करतात. अशा परिस्थितीत एलपीजीच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. वाढलेल्या किमतीपासून दिलासा हवा असेल तर आजच तुमचा एलपीजी सिलिंडर बुक करा, आजच बुक केल्यास तुम्हाला नवीन दरातून पैसे द्यावे लागणार नाहीत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

पीएम किसान योजनेच्या केवायसीसाठी एकच दिवस
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी मिळविण्यासाठी शेतक-यांसाठी ई-केवायसीची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२२ आहे. शेतक-यांनी हे काम ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण न केल्यास त्यांचा पुढील हप्ता अडकून पडू शकतो.

विमा एजंटचे कमिशन घटणार
ईरडाईने सामान्य विम्याचे नियम बदलले आहेत. आता विमा एजंटला ३० ते ३५ टक्क्यांऐवजी केवळ २० टक्के कमिशन मिळणार आहे. यामुळे लोकांच्या प्रीमियमची रक्कम कमी होईल. याचा फायदा ग्राहकांना होईल. मात्र, एजंटना आर्थिक फटका बसणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या