हैद्राबाद : सध्या देशाच्या राजकीय वर्तुळात तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे देशात तिसरी आघाडी तयार करण्यात व्यस्त असल्याचे बोलले जात आहे. याबाबत त्यांनी बैठकाही घेतल्या असून अनेक नेत्यांच्या भेटीही घेणार आहेत. दरम्यान, येत्या जुलै महिन्यात राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वी त्यांना हा मोर्चा उभा करायचा आहे. राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवाराला आव्हान द्यायचे आहे. त्यामुळे ते सध्या विविध राजकीय पक्षांच्या प्रमुखांशी चर्चा करत आहेत.
इकॉनॉमिक टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, के. चंद्रशेखर राव सातत्याने विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटत आहेत. ते एनडीएचे सहयोगी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनाही या आघाडीत सामील करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत आहे. के सी आर यांनी शनिवारी अनेक विरोधी नेत्यांची बैठक घेतली. तसेच त्यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केल्याचीही माहिती मिळत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरव्ािंद केजरीवाल यांचीही राव यांनी भेट घेतली आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांचीही भेट घेतली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत बिगर-काँग्रेस आणि बिगर भाजप असा तिस-या आघाडीचा उमेदवार उभे करण्याचा के सी आर विचार करत आहेत.
देवेगौडांचीही भेट घेणार
के.सी.आर हे २६ मे रोजी बंगळुरु इथे जनता दल सेक्युलरचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचीही भेट घेणार आहेत. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत के. सी. आर यांनी देवेगौडा यांना बिगर भाजप आघाडीसाठी पाठिंबा दिला होता. अलीकडेच देवेगौडा यांनी के. सी. आर यांचे भाजप आणि सांप्रदायिक शक्तींविरुद्धच्या लढ्याबद्दल अभिनंदन केले होते. काँग्रेसला जर आम्हाला पाठिंबा द्यायचा असेल देऊ शकते. आम्ही सगळ्यांच्या पसंतीचा उमेदवार उभा करु असेही टीआरएसच्याकडून सांगण्यात आले आहे.
आणखीही नेत्यांना भेटणार
देवेगौडा यांची २६ मे रोजी भेट घेतल्यानंतर के सी आर २८ मे रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही भेट घेणार आहेत. भाजपच्या विचारसरणीशी संबंधित नसलेल्या सर्व नेत्यांना राव भेटणार आहेत. बॅनर्जी यांची भेट घेतल्यानंतर के सी आर राव हे बिहारमध्ये नितीश कुमार यांचीही भेट घेणार आहेत. महिनाखेरीस ते आरजेडी अध्यक्ष तेजस्वी यादव यांचीही भेट घेणार आहेत.