श्रीनगर: वृत्तसंस्था
दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या एन्काऊंटरमध्ये सुरक्षा दलांनी बुधवारी जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. चकमकीत ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांमध्ये एक जैश-ए-मोहम्मदचा आॅपरेशनल कमांडर आहे. अलीकडेच पुलवामामध्ये स्फोटकांनी भरलेली एक कार सापडली. त्या कटामध्ये हा आॅपरेशनल कमांडर सहभागी असल्याची दाट शक्यता आहे.
आज सकाळी पहाटेच्या सुमारास जम्मू-काश्मीर पोलीस, भारतीय लष्कर आणि सीआरपीएफ तिघांनी मिळून हे आॅपरेशन केले. एकाचवेळी तीन दहशतवाद्यांचा खात्मा हे सुरक्षा दलांचे मोठे यश आहे. सैन्य दलाच्या कारवाईत ठार झालेला जैशचा कमांडर मागच्या आठवडयात पुलवामात राजपोरामध्ये एका कार स्फोटाच्या कटात सहभागी होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जैशचा दहशतवादी आयईडी एक्सपर्ट आहे.
Read More चक्रीवादळापूर्वीच शहरात पडली २० झाडे
सापळा रचून दहशतवाद्यांना घेरले
गुप्तचरांकडून माहिती मिळाली होती. त्या आधारावर आज सकाळी ही संयुक्त कारवाई करण्यात आली. सापळा रचून दहशतवाद्यांना घेरण्यात आले. दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगण्यात आले होते. पण त्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत हे तिन्ही दहशतवादी ठार झाले, असे लष्कराने म्हटले आहे. पुलवामामधील एका गावातून अलीकडेच स्फोटकांनी भरलेली गाडी जप्त करण्यात आली होती. त्या कटामध्ये सुद्धा हा दहशतवादी सहभागी होता.