कुपवाडा : कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा येथे सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा यंत्रणांनी हंदवाडा परिसरात एका अल्पवयीन मुलासह तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. या तिघांनाही परिसरात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचे काम देण्यात आले होते.
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हंदवाडा येथील फ्रूट मंडी क्रॉसिंगवर संयुक्त ब्लॉक तपासणी मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांनी तीन तरुणांना संशयास्पद स्थितीत पाहिले. पोलिसांनी चालान कापल्यानंतर तिघांनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, सुरक्षा दलाच्या जवानांनी तिघांनाही पकडले. मंजूर अहमद कुमार, शौकत आणि एक अल्पवयीन अशी अटक करण्यात आलेल्या लोकांची नावे आहेत. सुरक्षा दलांनी त्यांच्याकडून एक पिस्तूल, एक पिस्तूल मॅगझिन, ७ गोळ्या आणि दोन हातबॉम्ब जप्त केले. पोलिसांचे म्हणणे आहे की, प्राथमिक तपासानंतर असे समोर आले आहे की हंदवाडा येथे दहशतवादी हल्ले करणे, लोकांना ठार मारणे आणि जखमी करणे यासह परिसरातील शांतता बिघडवणे यासाठी या तिघांना काम देण्यात आले होते.