पाटणा : विविध कारणांसाठी यंदा चर्चेत असलेल्या बिहार विधानसभा निवडणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी तगडा बंदोबस्त असणार आहे. यासाठी सुरुवातीला केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या ३०० कंपन्या पाठवण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आहे. याशिवाय लवकरच आयटीबीपी, सीआयएसएफ, सीआरपीएफ, एसएसबी, आरपीएफ आणि बीएसएफच्या तुकड्याही पाठवण्यात येणार आहेत.
बिहारच्या २४३ सदस्यीय विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शुक्रवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार राज्यात तीन टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान २८ ऑक्टोबर, दुस-या टप्प्यातील ३ नोव्हेंबर तर तिस-या टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या पहिल्याच निवडणुकीत संसर्ग टाळण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. २९ नोव्हेंबर रोजी बिहार विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. यावेळी मतदान केंद्रांची संख्या आणि मनुष्यबळ वाढवण्यात आले आहे. बिहारमध्ये २०२० च्या निवडणुकीत ७ कोटींहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये महिला मतदारांची संख्या ३ कोटींहून अधिक आहे.
१० लाख तरुणांना देणार नोक-या : तेजस्वी
बिहारमधील प्रमुख पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासने देण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवरच राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी बिहारच्या तरुणांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. आपले सरकार आल्यास पहिल्याच कॅबिनेट बैठकीत १० लाख तरुणांना नोकरी देण्याचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.
तिन्ही कृषी विधेयकांवर आता राष्ट्रपतींची मोहर