23.3 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeराष्ट्रीयतात्पुरते कोविड रुग्णालये उभारणार; १० हजार ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार

तात्पुरते कोविड रुग्णालये उभारणार; १० हजार ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांचे हाल थांबवण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहेत. सरकारने आता ऑक्सिजन उत्पादन करणा-या औद्योगिक कंपन्यांच्या परिसरातच तात्पुरती कोविड रुग्णालये उभारण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून नजिकच्या काळात कोरोना रुग्णांसाठी जवळपास १० हजार ऑक्सिजनयुक्त बेड उपलब्ध करून देण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बेड उपलब्ध झाल्यास देशात सध्या कोरोनामुळे होणारी जिवीतहानी नियंत्रणात आणण्यास मोठी मदत होणार आहे.

पंतप्रधान मोदींनी बैठकांतून घेतला आढावा
देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे. सरकार आणि आरोग्य यंत्रणेपुढे गंभीर आव्हाने उभी राहिली आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग थोपवायचा कसा, या दृष्टीने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये पंतप्रधानांनी देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या ताज्या आकडेवारीचा आढावा घेतला. त्यानंतर सरकारकडून एक पत्रक जारी करण्यात आले. त्या पत्रकातून सरकार कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नव्याने काही पावले उचलणार आहे, त्याची माहिती देण्यात आली आहे.

पंतप्रधानांनी नायट्रोजन संयंत्रांना ऑक्सिजन संयंत्रांमध्ये रुपांतरित करण्याचे काम कोणत्या गतीने सुरू आहे, याचाही आढावा घेतला. सध्याच्या घडीला देशाला मेडिकल ऑक्सिजनची नितांत गरज आहे. त्याच अनुषंगाने सरकारने सध्याच्या नायट्रोजन संयंत्रांचे ऑक्सिजन संयंत्रांमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेची व्यवहार्यता शोधली आहे. अशा प्रकारच्या विविध संभाव्य उद्योगांची निश्चिती करण्यात आली आहे, ज्या ठिकाणी ऑक्सिजन उत्पादनासाठी संयंत्रांचे रुपांतर केले जाऊ शकते. मेडिकलच्या कामात याची मोठी मदत होऊ शकते, असे पंतप्रधान कार्यालयामार्फत जारी करण्यात आलेल्या एका पत्रकात म्हटले आहे.

आढावा बैठकांमध्ये चर्चा
आढावा बैठकांमध्ये सध्याच्या प्रेशर स्विंग ऍडसॉर्प्शन (पीएसए) नायट्रोजन संयंत्रांचे ऑक्सिजनच्या उत्पादनासाठी रुपांतर करण्याच्या प्रक्रियेवर सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकांमध्ये पंतप्रधानांचे प्रमुख सचिव, कॅबिनेट सचिव, रस्ते परिवहन आणि हायवे मंत्रालयाचे सचिव तसेच इतर वरिष्ठ अधिका-यांनी सहभाग घेतला होता. नायट्रोजन संयंत्रांमध्ये कार्बन मॉलिक्युलर सीवचा उपयोग केला, तर ऑक्सिजनच्या उत्पादनासाठी जियोलाईट मॉलिक्युलर सीवची आवश्यकता असते.

१४ उद्योगांच्या ठिकाणी काम प्रगतीपथावर
उद्योगांशी केलेल्या चर्चाविनिमयानंतर सरकारने आतापर्यंत १४ उद्योगांच्या नावांची यादी केली आहे, ज्या ठिकाणी नायट्रोजन संयंत्रांचे ऑक्सिजन संयंत्रांमध्ये रुपांतरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय उद्योग संघांच्या मदतीने ३७ नायट्रोजन संयंत्रांची ऑक्सिजन उत्पादनाची निश्चिती करण्यात आली आहे, असे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

तू चेन्नईला तुडवलंस; सेहवागचे पोलार्डसाठी मजेशीर ट्विट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या