23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeराष्ट्रीयगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा

गुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा

एकमत ऑनलाईन

मुंबई/गांधीनगर : गेल्या दोन दिवसांपासून तौत्के चक्रीवादळाने महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर धुमाकूळ घातला होता. कोकण किनारपट्टीनंतर सोमवारी मुंबईत दिवसभर चक्रीवादळाने धुमाकूळ घातला. त्यानंतर हे वादळ गुजरातच्या दिशेने पुढे सरकले. या वादळाचा गुजरातमधील सीमा भागाला जोरदार तडाखा बसला असून, अनेक ठिकाणी शेकडो झाडे उन्मळून पडली. विजेचे पोल जमीनदोस्त झाले. त्यामुळे अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला. तसेच रस्ते वाहतूक खोळंबली. या वादळाचा गुजरातच्या सीमा भागातील २४०० वर गावांना फटका बसला आहे, अशी माहिती गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दिली.

सोमवारी रात्री उशिरा तौत्के चक्रीवादळाचा ‘आय’ अर्थात केंद्रबिंदू गुजरातमध्ये दीवजवळ पोहोचला. त्यामुळे सौराष्ट्रच्या किनारी भागात लँडफॉल झाल्यानंतर तौत्केने सौराष्ट्रला जोरदार तडाखा दिला. यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला, तर तब्बल १६ हजार ५०० घरांचे नुकसान झाले. या भागातअनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. सतर्कतेची उपाययोजना म्हणून संभाव्य प्रभावित क्षेत्रातील गावे आधीच खाली करण्यात आली होती. गुजरातच्या किनारी भागातून तब्बल २ लाख नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले होते. त्यामुळे मोठी जीवित हानी टाळण्यात महाराष्ट्र आणि गुजरातला यश आले. तुफान पाऊस आणि १०० ते ११० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणारे वारे प्रभावित भागात अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. त्यामुळे प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री रुपाणी यांनी स्पष्ट केले.

गुजरातमध्ये धडकले वादळ
केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्याला तडाखा दिल्यानंतर सोमवारी गुजरातमध्ये शिरलेल्या तौत्के चक्रीवादळाने अनेक जिल्ह्यांना धडकी भरवली. सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी गुजरातच्या राजकोट, अमरेली आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला. आता हे वादळ अहमदाबादच्या दिशेने पुढे सरकले आहे.

विजेचे खांब कोसळले, वीज पुरवठा खंडित
चक्रीवादळाचा लँडफॉल गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीवर सुरू झाला, तेव्हा किनारी भागातील एकूण २४०० गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला. विजेचे हजारो खांब कोलमडून पडले, या भागातले तब्बल १६० रस्ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून तब्बल ४० हजार झाडे उन्मळून पडल्याची माहिती मुख्यमंत्री रुपाणी यांनी दिली.

चक्रीवादळाची तीव्रता घटली
गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाचा लँडफॉल झाल्यानंतर या वादळाची तीव्रता घटली. रात्री उशिरापर्यंत या चक्रीवादळाची तीव्रता अजून कमी होईल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. गेल्या दोन दशकांहून अधिक काळातील तौत्के हे सर्वांत शक्तिशाली चक्रीवादळ होते, असे सांगितलं जात आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू
गेल्या तीन दिवसांत ५ राज्यांतील २६ जणांचा चक्रीवादळाने मृत्यू झाला. यात सर्वाधिक ११ मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. यातील रायगड जिल्ह्यात ४, रत्नागिरीत २, ठाण्यात २ तर सिंधुदुर्ग आणि धुळे जिल्ह्यात प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच महाराष्ट्रात ६,३४९ गावांना तौत्के चक्रीवादळाचा फटका बसला आहे. कर्नाटकात ५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर गोवा आणि तामिळनाडूत प्रत्येकी २-२ जणांना प्राण गमवावे लागले. तसेच गुजरातमध्ये तिघांचा मृत्यू झाला.

खतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या