28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयवाहतूक खर्च ७.५ टक्क्यांपर्यंत खाली येणार?

वाहतूक खर्च ७.५ टक्क्यांपर्यंत खाली येणार?

एकमत ऑनलाईन

नवे राष्ट्रीय पुरवठा धोरण, सध्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या १३ ते १४ टक्के खर्च
नवी दिल्ली : वस्तूंच्या वाहतुकीचा खर्च कमी करण्याचे उद्दिष्ट असलेल्या नव्या ‘राष्ट्रीय पुरवठा धोरणा’च्या आरंभाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केली. यामुळे सध्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या १३ ते १४ टक्के असलेला वाहतूक खर्च ७.५ टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यासाठीच नवे राष्ट्रीय पुरवठा धोरण निश्चित करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. यातून वाहतूक खर्चात मोठी बचत होण्यास मदत होऊ शकते.

भारत ही जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थसत्ता आहे. भारत उदयोन्मुख उत्पादन केंद्र बनत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. नव्या पुरवठा धोरणांतर्गत ‘युनिफाईड लॉजिस्टिक्स इंटरफेस प्लॅटफॉर्म (यूएलआयपी)आणि ‘ईझ ऑफ लॉजिस्टिक सव्­िर्हसेस (ई लॉग्ज) ही दोन संकेतस्थळे सुरू करण्यात आली आहेत. याद्वारे मालवाहतूक अधिक सुकर होईल, असा विश्वास केंद्र सरकारला आहे. यूएलआयपीमुळे वाहतुकीबाबत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील, तर ई लॉग्जमुळे उद्योजकांना आपल्या समस्या तातडीने अधिका-यांकडे मांडता येतील. समस्यांचे निराकरण करण्यासाठीही स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात आली आहे, असेही सांगण्यात आले.

वाहतुकीत सुलभता आणि खर्चात बचत करणारे हे धोरण असून, यात अधिकाधिक नवतंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यातून आगामी काळात निश्चित केलेले उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होईल, असे औद्योगिक उत्पादन पुरवठा विभागाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अन्शुमन सिंग यांनी सांगितले. यासोबतच ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक विनीत अग्रवाल यांनी वाहतुकीचे अनेक पर्याय आणि अत्याधुनिक यंत्रणांचा वापर यातून ब-याच गोष्टी सोप्या होणार असल्याचे म्हटले.

‘ड्रोन’चा वापर वाढवणार
आगामी काळात वाहतुकीमध्ये ‘ड्रोन’चा वापर वाढवण्याचेही सरकारचे नियोजन आहे. वाहतूक अधिक जलद करणे आणि त्याच वेळी खर्च घटवण्यासाठी तंत्रज्ञानाची अधिकाधिक मदत घेतली जाणार असल्याचे या धोरणांशी संबंधित अधिका-यांनी सांगितले.

कार्बन उत्सर्जन घटणार
नव्या वाहतूक धोरणामुळे देशात व्यवसाय करणे अधिक सुलभ होणार आहे. एवढेच नव्हे, तर वाहतुकीचे पर्याय उपलब्ध करून दिल्यास कार्बन उत्सर्जन घटण्यासही मदत होणार आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या