नवी दिल्ली : राहुल गांधी सध्या लंडनमध्ये आहेत. त्यांनी तिथल्या एका कार्यक्रमात भारतातल्या केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. राहुल गांधींनी भारताची तुलना पाकिस्तानशी केली आहे. तसेच पंतप्रधान मोदी कोणाचेच ऐकत नाहीत, असेही ते म्हणाले आहेत.
लंडनमध्ये आयोजित केलेल्या एका परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. ‘आयडिया ऑफ इंडिया’ या कार्यक्रमात राहुल गांधींनी असेही म्हटले आहे की, भारतात माध्यमं एक बाजू घेऊन काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणाचंच ऐकत नाहीत. देशातली लोकशाही धोक्यात आहे, कारण संविधानिक मूल्यांवरती सातत्याने हल्ले होत आहेत.
पंतप्रधान मोदींसह भाजपावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, भाजपाने संपूर्ण देशात केरोसिन पसरवलंय. राज्यांची शक्ती कमी करण्यासाठी ईडी आणि सीबीआयचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. भारताचा आवाज एका विचारधारेने मारून टाकला आहे. आता ही एक राष्ट्रीय वैचारिक लढाई आहे.