भोपाळ : अयोध्येत येत्या पाच आॅगस्ट रोजी राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्यावेळी भाजपा नेत्या उमा भारती अयोध्येमध्ये असतील. पण त्या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. स्वत: उमा भारती यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. पाच आॅगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाचे उमा भारती यांना निमंत्रण देण्यात आले आहे. कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अन्य व्यक्तींच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपण उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे असे उमा भारती म्हणाल्या. अमित शाह आणि अन्य भाजपा नेत्यांना करोनाची लागण झाल्याचे ऐकल्यापासून मला अयोध्येत भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहणाºया व्यक्तींची चिंता सतावत आहे. खासकरुन पंतप्रधान मोदींची, असे उमा भारती यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
शरयू नदीच्या काठी करणार मुक्काम
राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजानाचा कार्यक्रम होईल, त्यावेळी आपण शरयू नदी किनारी थांबणार असल्याचे राम जन्मभूमी न्यासाच्या अधिकाºयांना सूचित केले आहे, असेही पुढे उमा भारती यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. अयोध्येसाठी आपण आज भोपाळहून रवाना होईन. अयोध्येत जाईपर्यंत आपण कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात येऊ शकते. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि शेकडो लोक ज्या ठिकाणी उपस्थित असतील तिथून आपण दूर राहणार आहे. पंतप्रधान मोदी आणि सर्वजण तिथून निघून गेल्यानंतर मी रामललाचे दर्शन घेण्यासाठी तिथे जाईन, असे उमा भारती यांनी म्हटले आहे.
Read More यंदा चीनच्या राख्यांना नकारघंटा