Tuesday, September 26, 2023

सीमेवर अभूतपूर्व स्थिती : परराष्ट्र मंत्र्यांचे वक्तव्य, वाटाघाटीतूनच तोडगा शक्य

नवी दिल्ली : भारत-चीनमध्ये सीमेवर तणाव कायम आहे. चीनकडून भारतीय क्षेत्रात घुसखोरीच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. दरम्यान, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारत-चीन सीमेवर अभूतपूर्व स्थिती असल्याचे म्हटले आहे आणि वाटाघाटीतूनच तोडगा काढायला हवा, असे जयशंकर म्हणाले.

भारत-चीन सीमेवर अभूतपूर्व स्थिती कायम आहे. दोन्ही देशांना चर्चा करावी लागेल आणि त्यातूनच तोडगा काढावा लागेल, असे एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. अलिकडेच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी रशियात मॉस्कोमध्ये चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली होती. दोघांमध्ये चर्चाही झाली होती. यानंतर जयशंकर यांनी पहिल्यांदाच हे विधान केले आहे. परराष्ट्र मंत्र्यांच्या या विधानामुळे दोन्ही देशांतील तणावाची स्थिती कायमच असल्याचे सध्याचे चित्र आहे. आतापर्यंत भारत-चीनमध्ये द्विपक्षीय चर्चा झालेली आहे. दोन दिवसांपूर्वी तर दोन्ही देशांत मॅरेथॉन बैठक झाली. परंतु तोडगा निघू शकला नाही.

रशियात मॉस्कोमध्ये भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची काही दिवसांपूर्वीच अडीच तास बैठक झाली. प्रत्यक्ष ताबा रेषेवरील तणावादरम्यान ही बैठक झाली. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात झालेल्या बैठकीत सीमेवरील तणाव संपवण्यासाठी पाच-कलमी करार झाला. त्याच वेळी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरूच राहतील आणि सैन्य हटवण्याची प्रक्रिया वेगवान करण्यात येईल, यावर सहमती झाली होती.

पूर्व लडाखमध्ये सीमेवर चीनशी तणावची स्थिती कायम आहे. यादरम्यान, भारताकडून सर्व प्रकारची तयारी केली जात आहे. एकीकडे सीमेवर सैनिकांच्या तैनातीत वाढ करण्यात आली आहे तर दुसरीकडे सीमेवर कमीत कमी वेळेत पोहोचण्यासाठी पायाभूत सुविधांवरही भर देण्यात येत आहे. दुसरीकडे चीननेही सीमेवर आपले सैन्य वाढवले आहे. त्याचबरोबर भारत आणि चीनच्या सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्न सुरू आहेत. भारतीय हवाई दलानेही चीनच्या कुठल्याही चालीला उत्तर देण्यासाठी आपली सतर्कता वाढवली आहे.

चीनने बांधकाम थांबविले तरच सैन्य मागे हटविता येईल
मंगळवारी सैन्य कमांडर्सच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर सीमेवर मर्यादित स्वरुपात सैनिकांना मागे हटवण्याच्या प्रक्रियेस सुरवात होईल, अशी अपेक्षा होती. दगाबाजीचा चीनचा स्वभाव पाहता अशा गोष्टींवर लगेच विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यामुळे सैनिक मागे हटवणे चिनी नेतृत्वाच्या राजकीय हेतूंवर अवलंबून असेल, असे केंद्र सरकारमधील सूत्रांनी सांगितले. एलएसीजवळ चीनकडून सुरू असलेले वेगवान बांधकाम थांबवणे अपेक्षित आहे, तरच सीमेवरून सैनिक हटवण्याची प्रक्रियेला चालना मिळेल. चीनची चलाखी पाहता भारत सीमेवरील एप्रिलमधील जैसे थे स्थिती बहाल करण्याच्या मागणीवर ठाम आहे.

पंढरपुरात धनगर समाजाचे ढोल बजाओ सरकार जगाओ आंदोलन

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या