21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeराष्ट्रीयऑगस्टमध्ये लहानांना लस?

ऑगस्टमध्ये लहानांना लस?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या तिस-या लाटेची शक्यता वर्तवली जात असतानाच, एक दिलासादायक वृत्त समोर आले आहे. देशात मुलांसाठी ऑगस्टपर्यंत कोरोना लस येण्याची शक्यता आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे. मंगळवार दि़ २७ जुलै रोजी संसद भवनात झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी लसीकरणासंदर्भात खासदारांना माहिती दिली.

यादरम्यान, मुलांसाठी ऑगस्ट महिन्यापर्यंत लस येऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे. देशात कोरोनाच्या दुस-या लाटेचा परिणाम अद्यापही जाणवत असतानाच तिस-या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. अशात ही लस आलीच, तर ही दिलासादायक गोष्ट असेल. देशात सध्या १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांनाच कोरोना लस देण्यात येत आहे. कोरोनाच्या दुस-या लाटेचा परिणाम मुलांवरही बघायला मिळाला आहे. तिस-या लाटेत ही संख्या वाढू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे मुलांसाठीच्या लसीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लसींवर काम सुरू
भारत बायोटेकची लस कोव्हॅक्सीनची ट्रायल सुरू आहे. याचा अंतिम निकाल ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत येण्याची आशा आहे. याशिवाय, जायडस कॅडिलाच्या मुलांच्या लसीची ट्रायल पूर्ण झाली आहे. अशात लवकरच हिलाही मंजुरी मिळू शकते. तसेच फायझर, मॉडर्ना सारख्या लसींचेही काम सुरू आहे.

तीन टप्प्यांत चाचणी
लहान मुलांवर त्यांच्या वयानुसार लसीची तीन टप्प्यांत चाचणी घेतली जात आहे. पहिल्या टप्प्यात १२ ते १८, तर दुस-या टप्प्यात ६ ते १२ आणि तिस-या टप्प्यात २ ते ६ वर्षांच्या मुलांचा समावेश आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसींची मुलांवरील चाचणी लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती यापूर्वी केंद्र सरकारने उच्च न्यायालयाला दिली होती.

ऑगस्ट अखेर तिस-या लाटेची शक्यता
भारतात कोरोना संसर्गाची दुसरी लाट संपताच तिस-या लाटेचा धोका वाढू लागला आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या डिव्हिजन ऑफ एपिडेमियोलॉजी अँड कम्युनिकेबल डिजीजचे प्रमुख डॉक्टर समीरन पांडा यांनी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस कोरोना व्हायरसची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली आहे. डॉक्टर समीरन पांडा यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी कोरोना संक्रमणाची तिसरी लाट दुस-या लाटेइतकी धोकादायक ठरणार नाही. मात्र, पुन्हा एकदा संपूर्ण देश कोरोनाच्या तिस-या लाटेच्या नियंत्रणाखाली येईल, असे ते म्हणाले.

पूर व दरड दुर्घटनांमधील मृतांची संख्या १९२ झाली, २५ जण अजूनही बेपत्ता

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या