नवी दिल्ली : चाळीस वर्षे वकिली केल्याने मला अजिबात राग येत नाही. पण सभागृहातील सध्याच्या वातावरणाने मी कांहीसा हताश, हैराण झालो आहे, असे सांगणारे राज्यसभेचे नवनिर्वाचित सभापती जगदीप धनखड आणि, तुम्ही सदैव नियमांचा दाखला देता. पण याच सभागृहाच्या काही प्रथा, परंपराही आहेत. राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर प्रश्न उद्भवतो तेव्हा तो विषय साऱया नियमांच्या पलीकडे असतो म्हणूनच आम्ही चर्चा मागत आहोत असे त्यांना त्याच क्षणी अत्यंत स्पष्टपणे सांगणारे विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात आज जोरदार शाब्दीक चकमक झडली.
चीनच्या कथित घुसखोरीवर संसदेत चर्चा मागणारे विरोधक व चर्चेला ठाम नकार कायम ठेवणारे सरकार यांच्यातील वादाने व गोंधळाने राज्यसभेत आजही बहुतांश शून्य काळाचे कामकाज पाण्यात गेले. सरकारच्या हटवादी भूमिकेच्या निषेधार्थ काँग्रेस व बहुतांश विरोधकांनी राज्यसभेतील कामकाजावर उर्वरीत सर्व काळासाठी बहिष्कार टाकला. विरोधकांच्या अनुपस्थितीत आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांनी दुपारच्या सत्रात शेरोशायरीतून विरोधकांवर टीका केली.
तुम्ही मला व सभागृहनेत्यांना आपल्या दालनात बोलावून चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. मात्र चीनच्या घुसखोरीचा मुद्दा ै आतै चर्चा करण्याचा नसून साऱाय देशासमोर, सभागृहात चर्चा करण्याचा आहे. पूर्ण देशाला माहिती व्हायला हवी की सीमेवर चीनने कसे पूल बांधलेत, कोणकोणती बांधकामे केलीत. समोरच्यापेक्षा जास्त देशभक्त इकडे (विरोधी बाकांवर) आहेत, असा टोला खर्गे यांनी लगावला. सभागृह नेते पियूष गोयल यांनी विरोधकांवर टीका केली.