24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयनियमांचे उल्लंघन, तिस-या लाटेला निमंत्रण!

नियमांचे उल्लंघन, तिस-या लाटेला निमंत्रण!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात हळूहळू कोरोनाचे रुग्ण कमी होताना दिसत आहेत. परंतु अजूनही देशात कोरोना महामारीची दुसरी लाट संपलेली नाही. मात्र, रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने अनेक ठिकाणी सरकारने सूट दिली आहे. मात्र, नागरिक याचा गैरफायदा घेत असून, सर्रास कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. एवढेच नव्हे, तर दिवसेंदिवस बेजबाबदारपणा वाढत चालला असून, पर्यटन स्थळांवरही ठिकठिकाणी गर्दी वाढू लागली आहे. विशेष म्हणजे मास्कचा वापर नाही आणि सोशल डिस्टन्सिंगचेही पालन होताना दिसत नाही. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने चिंता व्यक्त केली असून, असेच नियमांचे उल्लंघन होत राहिल्यास तिसरी लाट यायला वेळ लागणार नाही. याला नागरिकच जबाबदार असतील, असे म्हटले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे अनेक राज्यांत लॉकडाऊन लागू केला होता. मात्र, त्यामुळे अनेक ठिकाणी व्यवहार ठप्प राहिले. याचा विचार करून कोरोनाच्या दुस-या लाटेची तीव्रता कमी होताच अनेक शहरांत आणि जिल्ह्यांत काही अंशी सूट दिली गेली. त्यामुळे व्यवहार सुरळीत सुरू झाले. मात्र, या दरम्यान कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करायला हवे होते. तथापि, तसे होताना दिसत नाही. उलट कोरोनाचे संकट संपल्यागत अनेक नागरिक वावरत आहेत. एवढेच काय, तर मास्कविना बाहेर पडणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणे सर्रास सुरू आहे. एवढेच काय, तर पर्यटनस्थळी बंदी असतानाही नागरिक गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे चिंता वाढली असून, या बेफिकीरीमुळे तिसरी लाट लवकर येण्याची भीती निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी पर्यटनस्थळी कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारांनी काय उपाययोजना केल्या आहेत, याचा आढावा आज घेतला. यावेळी उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गोवा, केरळ आणि तामिळनाडूमधील कोरोनाची स्थिती, लसीकरण आणि गर्दी रोखण्यासाठीच्या उपाययोजना यासंबंधी व्यापक चर्चा केली. यावेळी केंद्रीय गृह सचिव बल्ला यांनी पर्यटनस्थळी वाढणा-या गर्दीबद्दल चिंता व्यक्त केली आणि नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे अन्यथा तिस-या लाटेचे संकट येण्याचा धोका आहे. याला मग नागरिकच जबाबदार असतील, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

अनेक राज्यांत दुस-या लाटेचीच चिंता कायम
ब-याच राज्यांत कोरोनाच्या दुस-या लाटेतील रुग्ण कमी झाले आहेत. तसेच ब-याच केंद्रशासित प्रदेशातही दिलासादायक स्थिती आहे. मात्र, अद्याप दुसरी लाटच नियंत्रणात आलेला नाही. कारण उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांत संक्रमणाचा दर अजूनही १० टक्क्यांवर आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट संपत आली आहे, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी बेजबाबदारपणे वागू नये, असे आवाहन बल्ला यांनी केले.

राज्यांनी गंभीर दखल घ्यावी
पर्यटनस्थळ किंवा अन्य गर्दीच्या ठिकाणी नागरिकांचा बेजबाबदारपणा वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यांनी याबाबत कठोर पावले उचलून नियमांचे सक्तीने पालन करायला लावणे आवश्यक आहे. अर्थात, मास्कचा वापर करणे आणि सामाजिक अंतर राखणे या गोष्टींचे पालन व्हायलाच हवे, तरच कोरोनाला रोखणे शक्य आहे, असे केंद्रीय गृह सचिव म्हणाले.

पंचसूत्रीचे पालन हवे
राज्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत केंद्रीय गृह सचिवांनी राज्यांनी पाचस्तरीय रणनीती स्वीकारावी, असे म्हटले आहे. यामध्ये कोरोनाची चाचण्या वाढविणे तर आवश्यक आहेच. शिवाय संसर्ग झालेल्यांच्या संपर्कात येणा-यांची ओळख, उपचार, लसीकरण आणि कोरोनाला रोखण्यासाठींच्या नियमांचे पालन याचा यामध्ये समावेश आहे. या अगोदर २९ जून रोजी यासंबंधी आदेश जारी केला होता. त्याचे पालन नागरिकांनी करावे, असेही भल्ला यांनी सांगितले.

राज्यात दिवसभरात ८२९६ रुग्ण, १७९ मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या