नवी दिल्ली : एकीकडे देशातील जनतेला किरकोळ महागाई दरामध्ये दिलासा मिळाला असतानाच ग्राहकांना आता आणखी एक धक्का बसला आहे. घाऊक महागाई दर मे महिन्यात पुन्हा १५ टक्क्यांवर नोंदवला गेला असून, घाऊक महागाई दर १५.८८ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. एप्रिल महिन्यात हा दर १५.०८ टक्के होता ज्यामध्ये मे महिन्यात वाढ नोंदवण्यात आली आहे.
त्यामुळे किरकोळ महागाई दरात घट नोंदवल्याचा काहीसा दिलासा देणाऱ्या बातमीनंतर दुसऱ्याच दिवशी सामान्यांना जोरदार झटका बसला आहे. घाऊक महागाई दर वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे खनिज तेल, कच्चे तेल, नैसर्गिक वायूच्या किमतीत झालेली वाढ मानण्यात येत आहे.
सलग १४ महिने दुहेरी अंकात
खाद्यपदार्थांपासून इतर गोष्टींच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीमुळे घाऊक महागाईच्या दरात विक्रमी नोंद करण्यात आली आहे. वाढत्या किमतींमुळे सलग १४ महिन्यात घाऊक महागाई दर दुहेरी अंकात नोंदवला जात आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत घाऊक महागाई दर १३.११ टक्के होता. घाऊक महागाईचा हा नवा उच्चांक गेल्या नऊ वर्षांतील सर्वोच्च असून, गेल्या ३० वर्षांतील एप्रिल महिन्यातील हा दर सर्वाधिक आहे.