37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeराष्ट्रीयराजस्थानातील तिढा सुटणार?

राजस्थानातील तिढा सुटणार?

एकमत ऑनलाईन

सचिन पायलट भूमिकेवर ठाम, पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्याचा इन्कार

जयपूर : राजस्थानमधील सत्ता संघर्षात काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची सरशी झाल्याचे चित्र आहे. १०० हून अधिक आमदारांनी पाठिंबा दिल्याने गहलोत यांनी त्यांची परेड घडवत शक्तिप्रदर्शन केले. दुसरीकडे कॉंग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी सचिन पायलट यांच्याशी चर्चा केली असून, चर्चेचा फॉर्म्युला मांडण्यात येत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, पायलट यांनी आपली कोणाशीही चर्चा झाली नसून, चर्चेचा फॉर्म्युलाही मांडला नसल्याचे सांगत पुरेसे संख्याबळाचा गहलोत यांचा दावा खोटा आहे. त्यांनी संख्याबळ मोजावे, असे आव्हान दिले आहे. दरम्यान, कॉंग्रेसनेही पायलट यांच्या संपर्कात असल्याचे वृत्त फेटाळले. अशा स्थितीत पेच सुटणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राजस्थानमधील सत्ता बदल घडविण्यासाठी अतिशय वेगाने कामाला लागलेले काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा फडकवला होता. आपल्यासोबत काँग्रेसचे ३० आमदार असून गहलोत सरकार अल्पमतात आल्याचा दावाही त्यांनी रविवारी रात्री केला होता. यासह काही अपक्ष आमदारांचाही त्यांना पाठिंबा असल्याचे बोलले जात होते. मात्र, सोमवारी पायलट यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगण्यात आले. एवढेच नव्हे, तर कॉंग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी संपर्क केल्याचेही सांगण्यात येत होते. यादरम्यान काँग्रेसच्या आमदारांनी मुख्यमंत्री गहलोत यांना पाठिंबा दर्शवला. यावेळी गहलोत यांना १०९ आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात आले.

तत्पूर्वी, सचिन पायलट यांनी हवे तर चर्चेला यावे, असे आवाहन आज काँग्रेसने केले होते. त्यांनी बैठकीला उपस्थित राहावे आणि चर्चा करून मतभेद सोडवावेत, असे काँग्रेसने म्हटले. पण सचिन पायलट यांनी या बैठकीला जाण्यास नकार दिला होता. सचिन पायलट दोन दिवसांपासून दिल्लीत आहेत. जयपूरला परतणार नाही, असे सांगण्यात येत होते. पण काँग्रेस नेतृत्वाने गेल्या ४८ तासांत सचिन पायलट यांच्याशी अनेकदा चर्चा केली, असा दावा काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला होता. एकीकडे कॉंग्रेस त्यांची समजूत काढत असल्याचे सांगत असले, तरी दुसरीकडे पायलट कॉंग्रेस नेत्यांशी चर्चेचा दावा फेटाळत आहेत. त्यामुळे साशंकता वाढली आहे.

गहलोतांचा संख्याबळाचा दावा खोटा : पायलट
मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दुपारी कॉंग्रेस आमदारांची बैठक आपल्या निवासस्थानी घेतली. त्यावेळी कॉंग्रेसला १०९ आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात आले आणि सरकार स्थिर असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, गहलोत यांचा हा दावा खोटा असून, त्यांनी संख्याबळ दाखवावे, असे आव्हान पायलट यांनी दिले आहे. तसेच त्यांनी राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा झाल्याच्या वृत्ताचाही इन्कार केला. त्यामुळे पायलट यांची नाराजी कायम असल्याचे बोलले जात आहे.

आमदारांना हॉटेलमध्ये हलविले
कॉंग्रेस नेते पायलट यांची समजूत काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, दुसरीकडे कॉंग्रेस आमदार फुटण्याच्या भीतीने सर्व आमदारांना जयपूरनजीकच्या फेअर मॉंट हॉटेलमध्ये हलविले आहे. मुख्यमंत्री गहलोत यांच्यासह त्यांना पाठिंबा दिलेले सर्व आमदार जयपूरपासून २० कि.मी. अंतरावरील हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत.

राहुल गांधींशी चर्चा नाही
या अगोदर पायलट यांची समजूत काढण्यात यश आले असून, त्यांनी चर्चेचा फॉर्म्युला मांडल्याचे सांगण्यात येत होते. यासोबतच कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हेही पायलट यांच्या संपर्कात असल्याचेही सांगितले गेले. परंतु पायलट यांनी आपण राहुल गांधी किंवा अन्य नेत्यांशी संपर्कात असल्याचा इन्कार केला.

२० आमदार गैरहजर?
मुख्यमंत्री गहलोत यांच्या निवासस्थानी झालेल्या कॉंग्रेस विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत २० आमदार गैरहजर राहिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गहलोत यांना जबर झटका मानला जात आहे. या बैठकीत अनुपस्थित असणा-यांवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणीही करण्यात आल्याचे समजते.

Read More  टीसीएस देणार देशातील ४० हजार जणांना रोजगार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या