बालाघाट : एखाद्या घरात लहान बाळाचा जन्म झाला की अख्खे कुटुंब आनंदून जाते. या आनंदाची सीमाच नसते. त्यात जर जुळे झाले तर हा दुप्पट होतो. परंतु मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात एका महिलेने आपल्या कुटुंबाला चौपट आनंद दिला आहे. कारण तिने एकाच वेळी चार मुलांना जन्म दिला आहे. नवजात बालकांमध्ये तीन मुले आणि एक मुलगी आहे. चार मुलांच्या जन्मामुळे तिचे कुटुंब आनंदी आहे, मात्र या चारही बाळांची प्रकृती ठीक नसून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.
बालाघाटमध्ये एकाचवेळी चार अपत्यांचा जन्म होण्याची ही पहिलीच घटना आहे. २३मे रोजी जिल्हा रुग्णालय बालाघाटमध्ये किरणापूर तहसीलच्या जराही गावात राहणा-या २६ वर्षीय प्रीती नंदलाल मेश्राम हिने चार मुलांना जन्म दिला. रुग्णालयातील महिला डॉक्टरांच्या पथकाने शस्त्रक्रिया करून चारही बालकांना सुखरूप बाहेर काढले. ऑपरेशन करणा-या टीममध्ये डॉ. रश्मी वाघमारे, भूलतज्ज्ञ डॉ. दिनेश मेश्राम आणि स्टाफ सिस्टर सरिता मेश्राम यांचा समावेश होता.
जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक व सिव्हिल सर्जन डॉ. संजय धाबरगावे यांनी सांगितले की, जन्मानंतर बालकांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर सतत देखरेख करत आहे. बालरोगतज्ज्ञ डॉ. निलय जैन यांनी सांगितले की, अशा प्रकारचे ऑपरेशन करणे खूपच कठीण असते. ऑपरेशन करणा-या डॉक्टरांच्या टीमचेही त्यांनी कौतुक केले.