नवी दिल्ली : येत्या १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक पार पडणार असून, यासाठी सत्ताधा-यांसह विरोधी पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. या दरम्यान, आज विरोधी पक्षांच्या पार पडलेल्या बैठकीमध्ये विरोधी पक्षाकडून राष्ट्रपती पदासाठी यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी दिली आहे. विरोधी पक्षांतील नेत्यांच्या चर्चेनंतर यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही यावेळी रमेश यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला जयराम रमेश, सुधींद्र कुलकर्णी, दीपंकर भट्टाचार्य, शरद पवार, डी राजा, तिरुची शिवा (डीएमके), प्रफुल्ल पटेल, येचुरी, एनके प्रेमचंद्रन (आरएसपी), मनोज झा, मल्लिकार्जुन खर्गे, रणदीप सुरजेवाला, हसनैन मसूदी (नॅशनल कॉन्फरन्स) यांच्यासह अभिषेक बॅनर्जी आणि राम गोपाल यादव हेही या बैठकीला उपस्थित होते. याशिवाय या बैठकीला ओवैसी यांच्या पक्षाचे खासदार इम्तियाज जलीलही उपस्थित होते.