31.8 C
Latur
Saturday, April 1, 2023
Homeराष्ट्रीययेदियुरप्पांची राजकारणातून निवृत्ती

येदियुरप्पांची राजकारणातून निवृत्ती

एकमत ऑनलाईन

बंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येदियुरप्पा यांनी राजकारणातून संन्यास घेतला आहे. बुधवारी विधानसभेत ते भाषण करताना म्हणाले की हे माझे निरोपाचे भाषण आहे. हा एक दुर्मिळ क्षण आहे. कारण आता मी पुन्हा निवडणूक लढवणार नाही. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.

भाषणात त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभारही मानले. पुढे बोलताना ते म्हणाले की, देवाने जर मला शक्ती दिल्यास मी ५ वर्षांनंतर होणा-या पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेत आणण्यासाठी मी सर्वोतेपरी प्रयत्न करेन असे ते म्हणाले. मी आधीच सांगितले आहे की आता मी निवडणूक लढवणार नाही, पण पंतप्रधान मोदी आणि पक्षाने मला दिलेला सन्मान आणि पद मी आयुष्यभर विसरू शकणार नाही.

मला पदावरून हटवले नाही
सभागृहात भाषण करताना ते म्हणाले की विरोधक म्हणतात की, मला मुख्यमंत्रीपदावरून हटविण्यात आले. हे चुकीचे आहे. येदियुरप्पा यांना कोणीही मुख्यमंत्रीपदावरून हटवले नव्हते. मी वयोमानानुसार बाजूला होण्याचा निर्णय घेतला होता. खरं तर, जुलै २०२१ मध्ये येदियुरप्पा यांनी पक्षाच्या हायकमांडच्या आदेशानुसार मुख्यमंत्रीपद सोडले. त्यांच्या जागी बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री बनविण्यात आले. येदियुरप्पा यांच्या पक्षाच्या भूमिकेवर विरोधकांनी अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

घरी बसणार नाही
कर्नाटक अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी २४ फेब्रुवारी रोजी भाषण करण्याची विनंती सभापती आणि आमदारांनी त्यांना केली. विरोधी पक्षातील अनेक सदस्यांनी त्यांना पुन्हा विधानसभा निवडणूक लढवण्यास सांगितले. यावर येदियुरप्पा म्हणाले की निवडणूक न लढवण्याचा अर्थ असा नाही की मी घरी बसणार. विधानसभा निवडणुकीनंतर ते राज्याचा दौरा करून पक्ष आणि अन्य उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. पक्ष मोठा आणि मजबूत करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या