नवी दिल्ली : ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्ये झालेल्या बंडामुळे भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) संसदेत शक्ती वाढण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाच्या घटनादुरुस्ती विधेयकांना मंजुरी मिळवण्याच्या दृष्टीने दोन्ही सभागृहांत दोन तृतीयांश बहुमत मिळवण्याचा एनडीएचा प्रयत्न असून राज्यसभेत ही आघाडी आता अशा बहुमताजवळ पोहोचली आहे.
सध्या राज्यसभेतील रिक्त जागांसाठी झालेल्या निवडणुकांनी एनडीएला या सभागृहात दोन तृतीयांश बहुमताजवळ पोहोचवले आहे. एनडीएचे राज्यसभेत १४८ संख्याबळ आहे. तृणमूल काँग्रेसच्या तीन राज्यसभा सदस्यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर एनडीए बंगालमधील पोटनिवडणुकांमध्ये तिन्ही जागा जिंकू शकते. यामुळे या सभागृहातील एनडीएचे एकूण संख्याबळ १५४ होईल. तरी दोन-तृतीयांश बहुमतासाठी १६३ ही संख्या गाठण्यासाठी नऊ जागा कमी पडतील.
द्रमुक-आपची भूमिका
द्रमुकचे ८ व ‘आप’चे ३ असे ११ खासदार ‘इंडिया’ आघाडीपासून फारकत घेत आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीचे संख्याबळ राज्यसभेत ६४ झाले आहे. तर, वायएसआर काँग्रेस व बिजू जनता दलाच्या अनुक्रमे ७ व ६ जागा आहेत. हे पक्ष कोणत्याही बाजूला झुकून आपले वजन त्या पारड्यात टाकू शकतात.
















