नांदेड : प्रतिनिधी
शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विवेकनगर परिसरात एका फ्लॅटवर अंमली पदार्थविरोधी कायद्यानुसार (एनडीपीएस) कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत २ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिट्टा नावाचा अंमली पदार्थ जप्त केल्याची माहिती आहे.
प्राथमिक माहितीनुसार, विवेकनगर परिसरातील एका फ्लॅटमध्ये ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान सुमारे दोन ते तीन लाख रुपये किमतीचा चिट्टा नावाचा अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र, जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचे नेमके स्वरूप, त्याचे प्रमाण आणि किंमत याबाबत अधिकृत तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही. शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई झाल्याने शहरातील अमली पदार्थांच्या संभाव्य व्यवहारांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची चौकशी केली जात असून, संबंधित फ्लॅटमध्ये अमली पदार्थांचा साठा होता का? त्याचा पुरवठा कोठून केला जात होता आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे?, या दिशेने तपास केला जाण्याची शक्यता आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून या प्रकरणातील माहितीची पडताळणी सुरू असून, तपासातून आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांकडून अधिकृत माहिती जाहीर झाल्यानंतर जप्त मुद्देमाल, आरोपींची नावे, त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे आणि कारवाईचा नेमका तपशील स्पष्ट होणार आहे.
















