नवी दिल्ली : देशाच्या संसदेतील लोकसभा प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी सभागृहात उड्या घेतल्याने सर्वत्र गोंधळ निर्माण झाला. काही क्षणातच ही घटना देशभर पसरली. विशेष म्हणजे संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला आज २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे, नेमकं आजच संसदेत अशाप्रकारे घुसखोरी झाल्याने घुसखोरी करणारे नेमके कोण, त्यांचा यामागील उद्देश काय होता, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. संसदेत घुसखोरी करणा-यांची साथीदार युवती नीलम सिंह असून ही तरुणी मूळ हरियाणाच्या जींद जिल्ह्यातील आहे. तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यावेळी आपण कोण आहोत, ‘नही चलेगी नही चलेगी.. तानाशाही नही चलेगी… ‘ अशी घोषणाबाजी का केली हे तिने सांगितले.
नही चलेगी नही चलेगी.. तानाशाही नही चलेगी… अशी घोषणाबाजी करत संसद सभागृहात आणि संसदेच्या बाहेरही युवकांनी आपला रोष व्यक्त केला. यामध्ये २ युवक आणि एका युवतीचा सहभाग समोर आला आहे. पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. या अटक केलेल्यांमध्ये एक युवक अमोल शिंदे महाराष्ट्राच्या लातूरमधील असल्याचे समजते. तर, नीलम सिंह ही तरुणी मूळ हरियाणाच्या जींद जिल्ह्यातील आहे. नीलमला पोलिसांनी ताब्यात घेतले असून ‘नही चलेगी.. नही चलेगी.. तानाशाही नही चलेगी..’ असे म्हणत नीलमने आपण विद्यार्थी असल्याची माहिती दिली. नीलमचा व्हीडीओ समाजमाध्यमातून समोर आला आहे.
माझं नाव नीलम आहे, भारत सरकारकडून आमच्यावर होत असलेल्या अत्याचाराचा हा विरोध आहे. आम्ही आमचा हक्क मागतो, त्यावेळी लाठीचार्ज करून आम्हाला तुरुंगात टाकले जाते. आम्हाला टॉर्चर केलं जाते. त्यामुळे, आमच्याकडे कुठलंही दुसरं माध्यम नाही. आम्ही कुठल्याही संघटनेशी संबंधित नसून आम्ही विद्यार्थी आहोत. आम्ही बेरोजगार आहोत, आमचे आई-वडील एवढं काम करतात, ते मजूर आहेत, शेतकरी आहेत, व्यापारी आहेत, पण सरकार कुणाचाच आवाज ऐकत नाही. सरकारची ही हुकूमशाही चालणार नाही, असे म्हणत नीलमने त्यांचा संसदेतील कृत्याचा उद्देश आणि स्वत:बद्दल माहिती दिली.
दरम्यान, नीलमने स्वत:ची माहिती देताना, पोलिसांसोबत चालत असताना सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. हुकूमशाही बंद करा.. तानाशाही नही चलेगी.. भारत माता की जय.. अशी घोषणाबाजी केली. महिला पोलिसांनी नीलमला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.