मुंबई : प्रतिनिधी
मनसे नेते अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावरील एक्सवर पोस्ट शेअर करत नीट पेपरफुटीप्रकरणी सिस्टीमवर निशाणा साधला आहे. त्यानुसार, ‘नीट २०२६’ ची परीक्षा रद्द झाल्याच्या धक्क्यातून राजस्थान, दिल्ली, गोवा, उत्तर प्रदेश अशा राज्यांतून प्रामाणिक विद्यार्थ्यांनी नैराश्यातून आपले आयुष्यच संपवले, ही आत्महत्या नाही, तर या सिस्टीमने केलेला अधिकृत ‘खून’ आहे, असे अमित ठाकरे यांनी म्हटले.
नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्रातून या पेपरफुटी प्रकरणी दोन प्राध्यापकांना पोलिसांनी अटक केली आहे. अहोरात्र मेहनत करून अशा पद्धतीने परीक्षा रद्द झालेल्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्यांनी आत्महत्या करत आपला जीव गमावला आहे. या नीट पेपरफुटीप्रकरणी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या भोंगळ आणि भ्रष्ट कारभारामुळे आज देशातील आणि महाराष्ट्रातील २२ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात लोटले गेले आहे. ‘नीट २०२६’ची परीक्षा रद्द झाल्याच्या धक्क्यातून राजस्थान, दिल्ली, गोवा, उत्तर प्रदेश अशा राज्यांतून प्रामाणिक विद्यार्थ्यांनी नैराश्यातून आपले आयुष्यच संपवले, ही आत्महत्या नाही, तर या सिस्टीमने केलेला अधिकृत ‘खून’ आहे!
वर्षानुवर्षे डोळ्यात तेल घालून, दिवस-रात्र एक करून अभ्यास करायचा, आई-वडिलांनी शेतजमीन विकून किंवा कर्ज काढून क्लासेसची फी भरायची आणि परीक्षेच्या दिवशी या शिक्षण माफियांच्या मेहेरबानीमुळे पेपर फुटतो? आणि त्यावर उपाय काय तर परीक्षा रद्द! यापेक्षा अजून किती खालची पातळी गाठणार आहे सरकार?
या संपूर्ण घोटाळ्याचे धागेदोरे जेव्हा आपल्या महाराष्ट्राशी जोडले जातात, तेव्हा खरंच लाज वाटते. सीबीआय तपासातून समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. लातूरचे मूळ रहिवासी असलेले आणि चक्क एनटीएच्या पेपर सेटिंग पॅनेलमध्ये समाविष्ट असलेले प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे.
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यात आपल्या राहत्या घरी विशेष कोचिंगच्या नावाखाली त्यांनी मूळ प्रश्नपत्रिका आणि उत्तरे कोट्यवधी रुपयांना विकली. पुण्यातून सुरू झालेले हे रॅकेट नाशिक, अहिल्यानगर, जयपूर ते थेट हरियाणामधील गुरुग्रामपर्यंत पसरले आहे. १५ ते २० लाखांना एक-एक पेपर विकला गेला. म्हणजेच, ज्यांच्याकडे पैसा आहे ते डॉक्टर बनणार आणि जो प्रामाणिकपणे ६५० गुण मिळवण्याची क्षमता ठेवतो, त्याने आत्महत्येचा मार्ग निवडायचा?
या शिक्षण माफियांच्या आणि त्यांना पाठीशी घालणा-या उच्चपदस्थ अधिका-यांच्या मुसक्या आवळण्याची हिम्मत नाहीये का या सरकारमध्ये? केवळ परीक्षा रद्द करून आणि नवीन तारीख देऊन विद्यार्थ्यांचा मन:स्ताप कमी होत नसतो. या संपूर्ण रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांवर आणि दलालांवर अशी कठोर कारवाई झाली पाहिजे की, पुन्हा कोणत्याही विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचे धाडस होणार नाही. प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि त्यांच्या पालकांचा आक्रोश वाया जाणार नाही.
















