पुणे/लातूर: देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट-युजी २०२६’ (NEET-UG 2026) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) अधिक तीव्र केला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि लातूर येथील प्रसिद्ध ‘आरसीसी’ (RCC) कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या अटकेनंतर आता हे धागेदोरे त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचले आहेत. सीबीआयने आता प्रा. मोटेगावकर यांच्या पत्नीला नोटीस बजावली असून, चौकशीसाठी पुणे येथील सीबीआय कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
मोटेगावकरांच्या कुटुंबियांवर सीबीआयचा कडक पहारा
प्रा. शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने नुकतीच अटक केली असून, विशेष न्यायालयाने त्यांना ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मोटेगावकर यांची पुण्यात कसून चौकशी सुरू असतानाच, आता त्यांच्या मुलापाठोपाठ पत्नीलाही सीबीआयने चौकशीच्या फेऱ्यात ओढले आहे. परीक्षा पूर्वसंध्येला झालेल्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची साखळी आणि मनी ट्रेलचा (पैशांचा माग) शोध घेण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आल्याचे समजते.
लातूर, नांदेड, संभाजीनगरमध्ये खळबळ
मोटेगावकर यांच्या अटकेनंतर लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथील आरसीसी क्लासेसच्या शाखा बंद करण्यात आल्या आहेत. मराठवाड्यातील अनेक नामांकित आणि बड्या हस्तींच्या मुलांनी मोटेगावकर यांच्या माध्यमातून पेपर मिळवला असल्याचा सीबीआयला संशय आहे. या पार्श्वभूमीवर मोटेगावकर यांच्या पत्नीला पुण्यात हजर राहण्याचे आदेश दिल्यामुळे शिक्षण क्षेत्रात आणि पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पुढील दोन दिवसांत पुण्याच्या सीबीआय कार्यालयात होणाऱ्या या चौकशीतून अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
















