लातूर: देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET-UG २०२६ परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता लातूरमध्ये अधिकच घट्ट झाले आहेत. सीबीआयच्या तपासात या रॅकेटमधील अत्यंत धक्कादायक आणि आर्थिक व्यवहारांचे पुरावे समोर आले आहेत. ‘आरसीसी’ (RCC) कोचिंग क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकर आणि पेपर सेटर पी. व्ही. कुलकर्णी यांनी विद्यार्थी-पालकांच्या स्वप्नांचा सौदा करून त्यांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे.
१० ते १२ लाखांची ‘डील’ आणि डिजिटल पुरावे
सीबीआयच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, मोटेगावकर आणि कुलकर्णी यांनी मिळून NEET चा पेपर प्रति विद्यार्थी १० ते १२ लाख रुपयांना विकला. या व्यवहारांचे धागेदोरे शोधताना सीबीआयच्या हाती भक्कम ऑनलाईन ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड्स लागले आहेत. विशेष म्हणजे, अनेक पालकांनी आपल्या पत्नी किंवा मुलांच्या बँक खात्यावरून थेट आरोपींच्या खात्यावर पैसे वर्ग केले होते. हे डिजिटल पुरावेच आता या टोळीच्या अंगाशी आले आहेत.
‘गॉड’ बनला अटकेचा आधार
तपासात धक्कादायक खुलासा झाला आहे की, पुण्याच्या एका खाजगी अकादमीतील फिजिक्स शिक्षक तेजस शहा याने पेपरफुटीच्या साखळीत महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचे नंबर सहआरोपी मनीषा मांढरे हिच्या फोनमध्ये ‘गॉड’ (God) या नावाने सेव्ह होता. शहा याने फुटलेला पेपर मोटेगावकरांकडे पाठवला आणि मोटेगावकरांनी तो पुढे लातूरमधील बड्या डॉक्टरांपर्यंत पोहोचवला, अशी साखळी सीबीआयने उघड केली आहे.
डॉक्टरांचा ‘हव्यास’ आणि लातूर कनेक्शन
लातूरमधील ५ नामांकित डॉक्टरांची सीबीआयने कसून चौकशी केली आहे. यामध्ये बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे याला सीबीआयने नुकतेच अटक केली आहे. स्वतःची मुले डॉक्टर व्हावीत या हव्यासपोटी या डॉक्टरांनी लाखो रुपये मोजून पेपर विकत घेतल्याचा संशय आहे. सीबीआयने या विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक नोट्स, त्यांनी क्लासमध्ये सोडवलेले प्रश्न आणि प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका जप्त करून त्यांची पडताळणी सुरू केली आहे.
आतापर्यंत १३ जणांना अटक; तपास सुरूच
या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत दिल्ली, पुणे, नाशिक आणि लातूरसह देशभरातून एकूण १३ जणांना अटक केली आहे. सीबीआयने ४९ पेक्षा जास्त ठिकाणी छापे टाकून लॅपटॉप, मोबाईल आणि कागदपत्रे जप्त केली आहेत. मोटेगावकर आणि त्याचे सहकारी सध्या सीबीआय कोठडीत असून, त्यांच्याकडून अधिक माहिती काढली जात आहे.
२१ जून रोजी पुन्हा परीक्षा
पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आलेली NEET-UG २०२६ ची पुनर्रपरीक्षा आता २१ जून २०२६ रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी शिक्षण मंत्रालयाने कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.
















