नांदेड/बिलोली (विशेष प्रतिनिधी): देशभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट’ (NEET) परीक्षा पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे आता नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. लातूर आणि नांदेडमधील या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार प्रा. शिवराज मोटेगावकर याला केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अटक केल्यानंतर, आता त्याचा नांदेडमधील ‘मुख्य सल्लागार’ सीबीआयच्या रडारवर असल्याची चर्चा आहे. हा सल्लागार मूळचा बिलोली येथील रहिवासी असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात सुरू झाल्याने संपूर्ण नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
बिलोलीत सीबीआयच्या गाड्या? नागरिकांमध्ये तर्कवितर्क
सोमवारी (१५ मे रोजी) दुपारच्या सुमारास सीबीआयची ४ ते ५ संशयास्पद वाहने बिलोली शहरात आणि परिसरात दाखल झाल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली. तपास यंत्रणेच्या या गुप्त मोहिमेमुळे तालुक्यात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. हा छापा किंवा चौकशी प्रा. मोटेगावकरांच्या त्याच बिलोलीकर सल्लागाराशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. मात्र, सीबीआय किंवा स्थानिक प्रशासनाकडून या कारवाईला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा (Official Confirmation) मिळालेला नाही.
मोटेगावकरांच्या अटकेनंतर लातूर-नांदेड कनेक्शन उघड
नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर सीबीआयने देशभरात अनेक ठिकाणी छापे टाकून मोठ्या टोळ्यांचा पर्दाफाश केला आहे. या तपासाची पाळेमुळे लातूर आणि नांदेडमधील नामांकित कोचिंग क्लासेसपर्यंत पोहोचली. लातूरचा मुख्य सूत्रधार प्रा. शिवराज मोटेगावकर याला अटक झाल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले. मोटेगावकर याने नांदेड आणि लातूर भागात आपले मोठे जाळे निर्माण केले होते. या जाळ्याचा मुख्य कणा असलेला आणि मोटेगावकरांना प्रत्येक व्यवहारात सल्ला देणारा त्याचा उजवा हात मूळचा बिलोलीचा असल्याने आता तपास यंत्रणांनी आपला मोर्चा बिलोलीकडे वळवला असल्याचे समजते.
सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा
प्रा. मोटेगावकरांचा हा सल्लागार नेमका कोण? त्याने नीट पेपर फुटीमध्ये काय भूमिका बजावली? विद्यार्थ्यांकडून गोळा केलेल्या कोट्यवधी रुपयांची विल्हेवाट लावण्यात त्याचा हात होता का? याविषयी सोशल मीडियावर अनेक नावे आणि उलट-सुलट पोस्ट व्हायरल होत आहेत. या संवेदनशील प्रकरणामुळे अनेक बड्या असामींचे धाबे दणाणले आहेत.
तपास यंत्रणांच्या गोपनीयतेमुळे अधिकृत माहिती समोर आली नसली, तरी बिलोली परिसरातील काही संशयित व्यक्ती सध्या सीबीआयच्या कडक निगराणीखाली असल्याची खात्रीलायक माहिती आहे. आगामी काळात या प्रकरणात बिलोलीतून मोठी अटक किंवा खुलासा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
















