मुंबई / लातूर: देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणात आता दररोज नवे धक्कादायक आणि तितकेच गंभीर खुलासे समोर येत आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) तपासात आरोपींनी आपापल्या विषयाच्या कौशल्याचा वापर करून प्रश्नपत्रिका फोडल्याचे उघड झाले आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये शिक्षण क्षेत्रातील काही उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित व्यक्तींचा सहभाग असल्याने शैक्षणिक वर्तुळ हादरून गेले आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, लातूरमधील दयानंद महाविद्यालयात तब्बल २८ वर्षे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेला आणि सध्या पुण्यात वास्तव्यास असलेला प्रा. पी. व्ही. कुलकर्णी हा या महाघोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर येत आहे.
विषयानुसार वाटून घेतल्या होत्या जबाबदाऱ्या!
सीबीआयच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हे रॅकेट चालवले होते. प्रा. कुलकर्णी हा रसायनशास्त्र (Chemistry) विषयाचा तज्ज्ञ असल्याने, त्याच्याकडे केमिस्ट्रीचा पेपर फुटवण्याची मुख्य जबाबदारी होती. दुसरीकडे, नाशिकमधून अटक करण्यात आलेला शुभम खैरनार हा आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने जीवशास्त्राच्या (Biology) प्रश्नपत्रिकेची गोपनीय माहिती बाहेर पोहोचवत होता. वेगवेगळ्या विषयांचे पेपर वेगवेगळ्या माध्यमातून आधीच बाहेर काढून, मोठ्या आर्थिक व्यवहारांच्या बदल्यात ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जात असल्याचा दाट संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
२०१९ पासून ‘NTA’च्या पेपर सेटिंग पॅनेलमध्ये?
या तपासातील सर्वात खळबळजनक खुलासा म्हणजे प्रा. पी. व्ही. कुलकर्णी याचा नॅशनल टेस्टिंग एजन्सीशी (NTA) असलेला थेट संबध! सीबीआयच्या चौकशीत समोर आले आहे की, कुलकर्णी हा २०१९ पासून एनटीएच्या पेपर सेटिंग प्रक्रियेशी जोडला गेला होता. सुरुवातीला एक ‘विषय तज्ज्ञ’ (Subject Expert) म्हणून त्याची नियुक्ती झाली होती, परंतु हळूहळू त्याने थेट ‘वेटिंग टीम’पर्यंत मजल मारली.
काय असते ‘वेटिंग टीम’?
या प्रक्रियेत वेगवेगळ्या विषय तज्ज्ञांकडून अनेक प्रश्नसंच (Question Sets) तयार करून घेतले जातात. अंतिम टप्प्यात अत्यंत गोपनीयतेने दोन मुख्य प्रश्नपत्रिका निश्चित केल्या जातात. या संपूर्ण प्रक्रियेत कुलकर्णीचा सहभाग होता. धक्कादायक म्हणजे, पेपरच्या मराठी अनुवादाचे (Marathi Translation) काम देखील कुलकर्णीकडेच सोपवण्यात आले होते.
सामान्यतः एका तज्ज्ञाकडे एकच जबाबदारी देण्याचा नियम असताना, कुलकर्णीकडे प्रश्न तयार करणे आणि अनुवाद अशी दोन्ही महत्त्वाची व गोपनीय कामे एकाच वेळी कशी आली? यामागे एनटीएमधील आणखी मोठ्या अधिकाऱ्यांचा वरदहस्त होता का? या दिशेने सीबीआयचा तपास सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एनटीएचे दोन उच्चपदस्थ अधिकारी सध्या सीबीआयच्या रडारवर असून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची कसून चौकशी केली जात आहे.
मांढरे, वाघमारे आणि आर्थिक व्यवहारांचे जाळे
या प्रकरणात महाराष्ट्रातून आतापर्यंत प्रा. कुलकर्णी याच्यासह जीवशास्त्राच्या अधिव्याख्याता मनीषा मांढरे आणि ब्यूटिशियन मनीषा वाघमारे यांना अटक करण्यात आली आहे. तपास यंत्रणांच्या हाती लागलेल्या पुराव्यांनुसार, एनटीएच्या संशयास्पद अधिकाऱ्यांचे थेट संपर्क मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे यांच्याशी होते. याच महिलांच्या माध्यमातून गरजू आणि श्रीमंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळण्याचे आणि पेपर पुरवण्याचे एक मोठे जाळे (Network) विणले गेले होते.
पुण्यात वास्तव्यास असलेल्या कुलकर्णीने कॉलेजमधून निवृत्ती घेतल्यानंतरही मेडिकल प्रवेश परीक्षांच्या (NEET) मार्गदर्शनाचे काम सुरूच ठेवले होते. याच काळात त्याची ओळख मनीषा वाघमारेशी झाली आणि तिथूनच विद्यार्थ्यांसोबत आर्थिक तडजोडीचे व्यवहार सुरू झाले.
कोण आहे मुख्य सूत्रधार प्रा. पी. व्ही. कुलकर्णी?
पार्श्वभूमी: प्रा. पी. व्ही. कुलकर्णी हे लातूरमधील नामांकित दयानंद महाविद्यालयात रसायनशास्त्राचे (Chemistry) प्राध्यापक होते.
अनुभव: बारावी विज्ञान शाखा आणि मेडिकल प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात त्यांचे लातूर आणि पुणे परिसरात मोठे नाव होते.
आरोप: निवृत्तीनंतर त्यांनी पुण्यातून खासगी क्लासेस व मार्गदर्शन केंद्र सुरू केले. पेपर सेटिंग समितीत कार्यरत असतानाच त्यांनी आपल्या अधिकाराचा आणि पदाचा गैरवापर करून अत्यंत गोपनीय असलेल्या प्रश्नपत्रिका बाहेर काढल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
सध्याची स्थिती: लातूरमधील कैलास नगर येथे त्यांचे मूळ घर असले, तरी त्यांचे कुटुंब पुण्यात स्थायिक असल्याने ते बहुतांश वेळ पुण्यातच असायचे. सीबीआय सध्या त्यांच्या बँक खात्यांची, रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीची आणि संपर्कातील सर्व संशयितांची सखोल चौकशी करत आहे.
मोटेगावकरांवरही संशयाची सुई; ‘ईडी’ची नजर!
या संपूर्ण पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील प्रसिद्ध क्लासेस चालक शिवराज मोटेगावकर यांच्यावरही सीबीआयचा गंभीर संशय आहे. प्राथमिक तपासानुसार, आपल्या मुलाला मेडिकल क्षेत्रात मोठे करिअर मिळवून देण्यासाठी त्यांनी या रॅकेटचा किंवा पेपरचा वापर केला असावा, अशी शक्यता तपासून पाहिली जात आहे. मोटेगावकर यांच्या मुलाने यावर्षीच बारावी उत्तीर्ण होऊन NEET परीक्षा दिली आहे.
तपास यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटेगावकर यांना भविष्यात स्वतःचे मेडिकल कॉलेज किंवा एखादे मोठे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याची महत्त्वाकांक्षा होती. त्यासाठी आपला मुलगा ‘एमबीबीएस डॉक्टर’ व्हावा, अशी त्यांची योजना होती. क्लासेसच्या व्यवसायातून त्यांनी कोट्यवधी रुपयांची संपत्ती उभी केल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर आता अंमलबजावणी संचालनालय (ED) देखील त्यांच्या आर्थिक व्यवहारांची आणि मनी लाँड्रिंगच्या कोनाची समांतर चौकशी करण्याची शक्यता आहे.
देशातील परीक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
या संवेदनशील आणि मोठ्या शिक्षण घोटाळ्यामुळे देशातील सर्वोच्च आणि अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा व पालकांचा विश्वास पूर्णपणे डळमळीत झाला आहे. सीबीआयकडून आता या रॅकेटचे धागेदोरे आंतरराज्य पातळीवर शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सीबीआयचा तपास जसा पुढे जाईल, तसे महाराष्ट्रासह देशातील आणखी काही मोठे चेहरे आणि शैक्षणिक संस्थांचे चालक गजाआड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
















