पुणे: नीट-यूजी २०२६ (NEET-UG 2026) पेपर लीक प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) तपासातून एक मोठे नेटवर्क समोर आले आहे. या रॅकेटमध्ये परीक्षा यंत्रणेतील काही अंतर्गत लोक, दलाल आणि विविध राज्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार, हा पेपर लीक एकाच वेळी न होता अनेक टप्प्यांत झाला. परीक्षा प्रणालीच्या आतूनच प्रश्न आणि उत्तरे बाहेर काढण्यात आली आणि त्यानंतर ती वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचवली गेली. पुणे येथील बॉटनीच्या प्राध्यापिका मनीषा मंडहरे या परीक्षा प्रक्रियेत विषय तज्ज्ञ (Subject Expert) म्हणून कार्यरत होत्या. त्यामुळे त्यांना बॉटनी आणि ज्युऑलॉजीच्या अत्यंत गोपनीय प्रश्नांची माहिती होती, असा संशय यंत्रणेला आहे.
या प्रकरणात निवृत्त केमिस्ट्री प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांचेही नाव समोर आले आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिकेचा (Answer Key) काही भाग परीक्षा यंत्रणेतून बाहेर काढण्यात आला होता. सीबीआयच्या माहितीनुसार, मनीषा मंडहरे आणि पुण्यातीलच मनीषा वाघमारे यांच्यात जवळचे संबंध होते. दोघी एकाच हाउसिंग सोसायटीत राहत असून वाघमारे या अनेकदा मंडहरे यांच्या घरी जात असत. मनीषा मंडहरे, पी. व्ही. कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे हे सर्वजण संगनमताने कट रचून काम करत होते, असा दावा सीबीआयने कोर्टात केला आहे. हा लीक झालेला पेपर पुढे शुभम खैरनार याच्यापर्यंत पोहोचवण्यात आला.
सीबीआयने न्यायालयाला सांगितले की, एप्रिल महिन्यात मनीषा मंडहरे यांनी पुण्यातल्या आपल्या घरी काही निवडक विद्यार्थ्यांसाठी एक ‘स्पेशल’ क्लास घेतला होता. या क्लासमध्ये विद्यार्थ्यांना बॉटनी आणि ज्युऑलॉजीचे प्रश्न सांगण्यात आले. मनीषा वाघमारे या विद्यार्थ्यांना या क्लासपर्यंत घेऊन येत असत. तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे की, मंडहरे या विद्यार्थ्यांना थेट प्रिंटेड पेपर न देता, प्रश्न तोंडानी बोलून लिहून घ्यायला सांगायच्या आणि नोटबुकमध्ये ते समजावून द्यायच्या. याशिवाय, आयुर्वेद डॉक्टर धनंजय लोखंडे यांचेही नाव समोर आले असून, त्यांना वाघमारे यांच्याकडून परीक्षेचे साहित्य मिळाले होते आणि ते या नेटवर्कमध्ये दलाल (मध्यस्थ) म्हणून काम करत होते.
शुभम खैरनार याने हा ‘गेस पेपर’ आरोपी यश यादवपर्यंत पोहोचवल्याचा सीबीआयला संशय आहे. यश यादवने २९ एप्रिल रोजी म्हणजेच परीक्षेच्या चार दिवस आधी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीच्या प्रश्नपत्रिका पीडीएफ (PDF) स्वरूपात टेलिग्रामवर शेअर केल्या होत्या. तसेच, मांगीलाल बीवाल नावाच्या व्यक्तीने आपल्या मुलासाठी लीक झालेला पेपर मिळवण्यासाठी १० ते १२ लाख रुपये देण्याचे कबूल केले होते. यश यादव राजस्थानच्या सीकरमध्ये कोचिंग करत असताना मांगीलाल यांचा मोठा मुलगा विकास बीवाल याला ओळखत होता. पेपर मिळाल्यानंतर मांगीलाल यांनी त्याच्या प्रिंट काढून आपला लहान मुलगा अमन बीवाल, नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांमध्ये वाटल्याचा दावा सीबीआयने केला आहे.
पेपर लीकचे गंभीर आरोप समोर आल्यानंतर नीट-यूजी २०२६ ची परीक्षा रद्द करण्यात आली होती आणि या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयने १२ मे रोजी एनटीएच्या (NTA) उच्च शिक्षण विभागाचे संचालक वरुण भारद्वाज यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होता. आता नीट-यूजी २०२६ ची परीक्षा २१ जून रोजी पुन्हा घेतली जाणार आहे. संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी सीबीआय सध्या जप्त केलेले इलेक्ट्रॉनिक उपकरणे, पैशांचे व्यवहार आणि कॉल रेकॉर्ड्सचा फॉरेन्सिक तपास करत आहे.
















