काठमांडू : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे २ दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर आहेत. ते गुरुवारी सकाळी येथे पोहचले. दरम्यान, एस जयशंकर यांनी गुरुवारी नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आणि पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांची भेट घेतली. या वर्षी आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यावर नेपाळला आलेले जयशंकर नेपाळ-भारत संयुक्त आयोगाच्या सातव्या बैठकीचे सह-अध्यक्षही असतील. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या दौऱ्याबाबत आनंद व्यक्त केला असून ते म्हणाले की, ‘नेबरहुड फर्स्ट’ धोरणाअंतर्गत नेपाळ हा भारताचा महत्त्वाचा भागीदार आहे. ही भेट दोन जवळच्या आणि मैत्रीपूर्ण शेजाऱ्यांमधील उच्चस्तरीय देवाणघेवाणीच्या परंपरेला अनुसरून आहे.
येथे पोहोचल्यानंतर जयशंकर यांनी राष्ट्रपती कार्यालय शीतल निवास येथे अध्यक्ष पौडेल यांच्याशी शिष्टाचाराची भेट घेतली. ‘राष्ट्रपती पौडेल यांनी नेपाळ आणि भारत यांच्यातील कनेक्टिव्हिटी, हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी आणि जलविद्युत क्षेत्रात भागीदारी आणि सहकार्यावर भर दिला.’ यानंतर जयशंकर यांनी पंतप्रधान प्रचंड यांची सिंहदरबार कार्यालयात भेट घेतली. नेपाळचे परराष्ट्र मंत्री एनपी सौद यांनी येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर जयशंकर यांचे स्वागत केले. यावेळी इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जयशंकर म्हणाले की, २०२४ मध्ये माझ्या पहिल्या भेटीसाठी पुन्हा नेपाळमध्ये परत आल्याने आनंद झाला. येत्या दोन दिवसांत होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये मी सहभागी होणार आहे. भारत-नेपाळ संयुक्त आयोगाची स्थापना १९८७ मध्ये झाली आणि द्विपक्षीय भागीदारीच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यासाठी दोन्ही बाजूंना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले.