15.3 C
Latur
Thursday, November 13, 2025
Homeमहाराष्ट्रघराणेशाहीचे राजकारण आता चालणार नाही

घराणेशाहीचे राजकारण आता चालणार नाही

ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा

मुंबई : घराणेशाहीचे राजकारण आता या देशात चालणार नाही. कामगिरीच्या बळावर देशाचे नेतृत्व ठरेल. एका गरीब कुटुंबात जन्मलेला चहा विक्री करणारा मुलगा देशाचा तीनदा पंतप्रधान बनतो हे आमच्या पक्षाने दाखवून दिले असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरे बंधू यांच्यावर निशाणा साधला. मुंबईत भाजपा कार्यालयाच्या भूमिपूजनासाठी ते आले होते. या कार्यक्रमातून त्यांनी भाजपा आणि घराणेशाहीचे राजकारण यावर भाष्य केले.

अमित शाह म्हणाले की, जो पक्षाच्या सिद्धांतावर चालतो, ज्याच्यात कामगिरी करण्याची ताकद आहे तोच भाजपात मोठा नेता बनू शकतो. कामगिरीच्या बळावरच देशाचे नेतृत्व ठरेल. घराणेशाहीचे राजकारण आता चालणार नाही. नरेंद्र मोदी हे उत्तम उदाहरण आहे. गरीब चहावाल्याच्या घरात जन्मलेला मुलगा, त्याचा त्याग, समर्पण, देशभक्तीच्या आधारे या देशाचा पंतप्रधान बनतो. ३ वेळा पंतप्रधानपद सांभाळण्याचे संधी मिळते. लोकशाही पक्षात आपला विश्वास किती दृढ आहे हे दिसून येते. जे पक्ष त्यांच्या संघटनेच्या कामकाजात लोकशाही आणू शकत नाही. ते पक्ष देशातील लोकशाहीचे कधी रक्षण करू शकत नाहीत असा टोला त्यांनी लगावला.

तसेच आज आपण भाजपच्या नवीन कार्यालयाचे भूमिपूजन करत आहोत पण जिल्हा मुख्यालयाचे काम बाकी आहे. प्रत्येक जिल्ह्यात डिसेंबर २०२६ पर्यंत भाजपाचं कार्यालय असायला हवे असे अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सूचना केल्या. शत प्रतिशत भाजपाच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत. अनेक बड्या नेत्यांनी आयुष्य पक्षासाठी आणि देशसेवेसाठी वेचले. त्यांच्या कामाचे फळ म्हणून आज जिल्हा परिषदेपासून पंचायत समितीपासून देशभर भाजपा पसरली असेही अमित शाह यांनी म्हटले.

विरोधकांचा सुपडा साफ करा
मी पक्षाचा अध्यक्ष बनलो, त्यानंतर निवडणुका लागल्या होत्या. आम्ही सन्मानजनक जागावाटपाची मागणी केली होती. परंतु ते झाले नाही आणि युती मोडली. आम्ही दीर्घ काळानंतर महाराष्ट्रात स्वतंत्र निवडणूक लढवली आणि महाराष्ट्रात पहिला भाजपाचा मुख्यमंत्री मिळाला. त्यानंतर सलग ३ वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात एनडीएने महाराष्ट्रात विजयी झाली. देवेंद्र फडणवीस आज पुन्हा मुख्यमंत्री म्हणून आपल्यासमोर आहेत. राज्यात डबल इंजिन सरकार झाले परंतु मी समाधानी नाही. मला ट्रिपल इंजिन हवे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिका या सर्व निवडणुकीत इतक्या ताकदीने भाजपा कार्यकर्त्यांनी लढावे, जेणेकरून विरोधकांचा सुपडा साफ होईल. दुर्बिण घेऊनही ते दिसायला नको, एवढ्या आवेशाने आपल्याला लढायचे आहे असं आवाहन अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR