अयोध्या : अयोध्येतील करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या राम मंदिरात सेवा करणा-या पुजा-यांसाठी एक नवीन ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. या नव्या नियमानुसार, आता सर्व पुजारी धार्मिक विधी आणि पूजा करताना पारंपरिक पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणार आहेत. मंदिरातील पूजा करणा-या पुजा-यांच्या सेकंड शिफ्टपासून हा नियम लागू करण्यात आला असून यामुळे पुजा-यांच्या वेशभूषेत मोठी सुसंगतता दिसून येत आहे.
शुक्रवारी या नियमाची घोषणा करण्यात आली. ट्रस्टने लागू केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दररोजची पूजा, आरती आणि इतर धार्मिक विधी पार पाडणारे पुजारी पिवळ्या रंगाचे उपरणं परिधान करतील. ही वेशभूषा वैष्णव परंपरा आणि मंदिरामध्ये पाळल्या जाणा-या रामानंदाचार्य संप्रदायाशी सुसंगत आहे. पारंपारिक मूल्यांचे जतन करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. धार्मिक विधींमध्ये अधिक अनुशासन, पाविर्त्य आणि पारंपारिक पेहराव आणणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले. पुजा-यांमध्ये एकरूपता राहावी, यासाठी हा बदल करण्यात आला आहे. सध्या मंदिरात सुरू असलेल्या झूलनोत्सव सोहळ्यादरम्यान हा नवीन ड्रेस कोड पुजा-यांनी परिधान केलेला पाहायला मिळाला. या महोत्सवात सहभागी होणा-या भाविकांना पहिल्यांदाच पुजा-यांचे हे नवे आणि एकसारखे रूप पाहायला मिळाले.
















