मुंबई : अंधश्रद्धा, तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. राज्यभरात खळबळ उडवून देणा-या या प्रकरणात सरकारची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी राज्य शासनाने ज्येष्ठ वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे.
अशोक खरात याच्याविरोधात अनेक महिलांनी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी दाखल केल्यानंतर नाशिक पोलिसांनी त्याला अटक केली होती. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आला असून तपासादरम्यान पोलिसांच्या हाती अनेक धक्कादायक पुरावे लागल्याचा दावा करण्यात आला आहे. खरातच्या कार्यालय आणि फार्म हाऊसवर झालेल्या कारवाईत महिलांचे शोषण केल्याचे कथित १०० हून अधिक अश्लील व्हीडीओ सापडल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे.
खरातविरोधात लैंगिक अत्याचार, फसवणूक तसेच महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.
दोषींना हमखास शिक्षा मिळणार?
अशोक खरात याचे काही बडे राजकीय नेते आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिका-यांशी संबंध असल्याच्या चर्चाही रंगत आहेत. त्यामुळे आता निकम यांच्या नियुक्तीनंतर या प्रकरणातील तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया अधिक वेगाने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक गाजलेल्या खटल्यांमध्ये प्रभावी युक्तिवाद करून दोषींना शिक्षा मिळवून देणारे उज्ज्वल निकम आता या प्रकरणात सरकारची बाजू मांडणार असल्याने राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे.
















