पिंपरी : प्रतिनिधी
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओवरून झालेल्या वादाचा राग मनात धरून नववीत शिकणा-या विद्यार्थ्याने त्याच वर्गातील विद्यार्थिनीवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २३) महाळुंगे येथील एका इंग्रजी शाळेच्या परिसरात घडली. या हल्ल्यात विद्यार्थिनी जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर आहे. हल्ला करणा-या विधिसंघर्षित बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांची १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी पाचगणी-महाबळेश्वर येथे सहल गेली होती. या सहलीदरम्यान कार्यक्रमात मुली नृत्य करत असतानाचा व्हिडिओ नववीत शिकणा-या विद्यार्थ्याने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. या व्हिडिओवरून विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला व्हिडिओ डिलीट करावा लागला होता.
या घटनेचा राग मनात धरून संबंधित विद्यार्थ्याने शुक्रवारी दुपारी विद्यार्थिनीवर चाकूने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थिनीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. घटनेची माहिती मिळताच बावधन पोलिसांनी तपास सुरू केला.
















