पुणे : प्रतिनिधी
राज्यभरात पावसाने ओढ दिली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीची दखल घेत नुकतीच केंद्रीय पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणी दौ-यानंतर खासदार निलेश लंके यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे शेतक-यांच्या वतीने तातडीच्या मदतीची मागणी केली आहे.
केंद्रीय पथकाने तातडीने जिल्ह्याची पाहणी केल्याबद्दल खासदार निलेश लंके यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, केवळ दौ-यांवरून शेतक-यांचे प्रश्न सुटणार नाहीत, याची जाणीव त्यांनी सरकारला करून दिली. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, सरकारने दुष्काळाच्या पाहणीसाठी एवढी तत्परता दाखवली, त्याबद्दल नक्कीच एक समाधान वाटतं. पण ज्या पद्धतीने आता पाहणी दौरा केला, केवळ तो दौरा करून काहीही साध्य होणार नाही. लोकांना आता तात्काळ मदत दिली गेली पाहिजे, ही आमची सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे.
शेतक-यांना १ लाख आणि मजुरांना २५ हजार द्या
ऐन सणासुदीच्या काळात शेतकरी आणि शेतमजूर आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधताना खासदार लंके यांनी मदतीचा आकडाही सुचवला आहे. ते म्हणाले की, येणा-या दस-याच्या आधी सरकारने शेतक-यांच्या खात्यात एक-एक लाख रुपये आणि शेतमजुरांना पंचवीस हजार रुपये दिले, तरच त्यांना थोड्याफार प्रमाणात आपला सण साजरा करता येईल .
एल निनोच्या प्रभावामुळे यंदा महाराष्ट्रात १९ टक्के पाऊस कमी झाला म्हणून सरकारने २६५ तालुक्यांमध्ये सप्टेंबरअखेर दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुष्काळी भागातील उपाययोजनांसाठी स्थापन मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक २९ सप्टेंबर रोजी झाली होती. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीतील चर्चेनंतर आणखी १८ तालुक्यांत प्रत्यक्ष पाहणीनंतर दुष्काळ जाहीर केला जाणार आहे.
















