मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राची सुजाण जनता दुधखुळी नाही. महाराष्ट्रात खोटे फॅक्ट्स पेरण्यात आणि जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यात तुमचा आणि तुमच्या दिल्लीतील ‘राजा बाबू’चा हात कोणीच धरू शकत नाही. लहान मुलाला विचारले तरी खोटेपणाच्या शर्यतीत पहिले नाव तुमचेच येईल अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. एक्स समाजमाध्यमात त्यांनी टवीट केले आहे.
वेगळा विदर्भ असो, धनगर आरक्षण असो किंवा मराठा आरक्षण या सारख्या असंख्य मुद्द्यावर तुमचा खोटारडेपणा उघडा पडला आहे, म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला ‘फसवणीस’ नाव दिले आहे. याउलट नोटबंदी, कोविडमधील अपयश, अर्थव्यवस्था, बेरोजगारी आणि महागाईवर राहुल गांधींनी जे प्रश्न उपस्थित केले, ते आज वास्तव म्हणून देशासमोर उभे आहेत.त्यामुळे इतरांवर ‘फेक नरेटिव्ह’चे आरोप करण्याचा तुमचा केविलवाणा प्रयत्न हास्यास्पद आहे असे सपकाळ म्हणाले.
















