बंगळुरू : दुकानावरील पाट्या आणि साइनबोर्ड कन्नड लावण्याच्या मागणीसाठी बंगळुरूमध्ये आंदोलन सुरु आहे. बुधवारी यावरून अनेक दुकानांची तोडफोडही करण्यात आली. दरम्यान या आंदोलकांना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार इशारा दिला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, कन्नड भाषेच्या वादात सरकार कोणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही. आम्ही कन्नड समर्थक कार्यकर्त्यांच्या विरोधात नाही पण त्यांनी कायदा हातात घेऊ नये. बेंगळुरूमधील मालमत्तेचे नुकसान सरकार सहन करणार नाही.
ते म्हणाले की, आपल्याला कन्नड भाषा वाचवायची आहे आणि त्यासाठी लढणाऱ्या लोकांचाही आपण आदर करतो, पण याचा अर्थ असा नाही की तिच्या नावाने होणाऱ्या तोडफोडीकडे सरकारने डोळेझाक करावी. कर्नाटक रक्षा वेदिकेचे (नारायण गौडा गट) कार्यकर्ते दुकानांवर कन्नड भाषेत साइनबोर्ड लावण्याच्या मागणीसाठी बंगळुरूमध्ये आंदोलन करत आहेत. ज्या दुकानांवर कन्नड भाषेतील फलक नाहीत अशा दुकानांचीही कार्यकर्त्यांनी नुकतीच तोडफोड केली. यावर उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी कठोर भूमिका घेतली आहे.