मुंबई : महाविकास आघाडीचा प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने मनसेला सोबत घेण्याचे निश्चित केले आहे. त्याला महाविकास आघाडीतील इतर पक्षांचा पाठिंबा असेल का? हा प्रश्न आहे. या संदर्भात आत्तापासूनच मतभेदाचे वारे वाहू लागले आहेत.
काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. मनसेला सोबत घेण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी सांगितले. सपकाळ यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मनसेला सोबत घेण्याबाबत आग्रही आहे. मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंनी मुंबई एकत्र मेळावा घेऊन पारंपारिक राजकारणाला धक्का दिला होता. त्या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेतेही हजर होते.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणात नवा प्रयोग म्हणून त्याकडे पाहिले जाते. शिवसेना आणि महायुती दोघांनाही मुंबई महापालिका महत्त्वाची आहे. दृष्टीनेच उद्धव ठाकरे यांनी मनसेला सोबत घेऊन महायुतीला धक्का दिला आहे. शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यास त्याचा मोठा परिणाम शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या मतदारांवर होऊ शकतो. त्याचा अप्रत्यक्ष फटका भाजपला देखील होईल. त्यामुळेच शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या विविध नेत्यांकडून मनसेने शिवसेनेसोबत जाऊ नये यासाठी प्रयत्न केले आहेत.
या स्थितीत काँग्रेसने मनसेला दूर ठेवण्याचा मनसुबा व्यक्त केला आहे. या निर्णयाने शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष दबावाखाली येऊ शकतो.
महाविकास आघाडीवर परिणाम होणार?
काँग्रेसच्या या निर्णयाचा परिणाम महाविकास आघाडीवर होणार आहे. राष्ट्रीय राजकारणात मुंबईत हिंदी भाषिकांना झालेली मारहाण, मराठीच्या प्रश्नावरून झालेले आंदोलन हे मुद्दे चर्चेत आहे. हिंदी पट्टयातील आपले राजकारण सांभाळण्यासाठी काँग्रेसने मनसेसोबत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. हे काँग्रेसचे कॅल्क्युलेटर राजकारण आहे.
शरद पवारांची भूमिका महत्वाची
मनसेला लांब ठेवण्याच्या काँग्रेसच्या निर्णयावरून आता महाविकास आघाडीत नव्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. विशेषता शिवसेनेची एक प्रकारे सोय आणि गैरसोय दोन्हीही होऊ शकते. महाविकास आघाडीचे नेते शरद पवार याबाबत काय भूमिका घेतात, हे महत्त्वाचे आहे.

