सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
कोरोना कालावधीतील एका आंदोलन प्रकरणी कुडाळ न्यायालयाने भाजपच्या ३ नेत्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. मंत्री नितेश राणे, आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांना कुडाळ न्यायालयाने दणका दिला. राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना कुडाळ न्यायालयाकडून अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. संविधान बचाव आंदोलन केल्या प्रकरणी आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांना अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ जून २०२१ रोजी झालेल्या ओबीसी आंदोलनात सहभाग घेतल्याप्रकरणी कुडाळ पोलिस स्थानकात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. सिंधुदुर्गात राजन तेली यांच्यासह आमदार निलेश राणे, मंत्री नितेश राणे यांच्यासह अन्य ४२ जणांवर आंदोलन प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणी न्यायालयात आज झालेल्या सुनावणीस आमदार निलेश राणे आणि राजन तेली तसेच अन्य आरोपी उपस्थित होते. मात्र, नितेश राणे यांच्यासह अन्य ५ जण गैरहजर होते.
मंत्री नितेश राणे वारंवार न्यायालयाच्या तारखांना गैरहजर राहिल्याने न्यायालायाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. दरम्यान, न्यायालयाने अनुपस्थित राहिलेल्या नितेश राणे यांच्या वकिलांचा विनंती अर्ज नाकारला. त्यामुळे, मंत्री महोदयांना कोर्टाकडून दणका देण्यात आला. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात.

