नागपूर/अकोला : २ सप्टेंबर रोजी राज्य सरकारने काढलेल्या जीआरनंतर ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातून आत्महत्यांचे सत्र निर्माण झाले आहे. या आत्महत्या थांबविण्यासाठी सरकारने हा काळा जीआर या रद्द करावा, या मागणीसाठी शुक्रवारी नागपुरात ओबीसींचा आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विदर्भासह राज्यभरातून हजारो ओबीसी बांधव सहभागी झाले होते. ओबीसींच्या हक्काला धक्का लावाल तर परिणाम वाईट होतील, असा इशारा या मोर्चाद्वारे देण्यात आला. दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांच्या कट्टर समर्थकाने अकोला येथे ओबीसी आरक्षण बचावासाठी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात २ सप्टेंबरला राज्य शासनाने काढलेल्या शासन निर्णयानुसार हैदराबाद संस्थानातील गॅझेटमध्ये ‘कुणबी’ अशी नोंद असलेल्या मराठा व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हीच बाब पारंपरिक ओबीसी समाजाच्या असंतोषाचे कारण ठरली आहे. ओबीसी नेत्यांचा ठाम आरोप आहे की, मराठा समाज सामाजिकदृष्टया मागास नाही आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात सामावणे म्हणजे ओबीसींच्या आरक्षणावर अतिक्रमण आहे. या विरोधात कॉंग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने नागपूरमध्ये सकल ओबीसी महामोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
आंदोलनकर्ते नागपुरात दाखल
मनोज जरांगे यांच्या मुंबई येथील आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्यासाठी काढलेल्या दोन सप्टेंबरच्या शासन निर्णयाचा विरोध करण्यासाठी विदर्भासह राज्यभरातून हजारो ओबीसी बांधव नागपूरच्या रस्त्यावर उतरले आहेत. एक हजाराहून अधिक बसेस, पाच हजाराहून अधिक चार चाकी वाहनाने आंदोलनकर्ते नागपुरात दाखल झालेले आहेत.
नागपूरात रस्ते ओबीसीमय
यशवंत स्टेडियममधून या मोर्चाला सुरुवात झाली असता यशवंत स्टेडियममधून मोर्चा निघाला होता. प्रत्येक जण हातात पिवळा झेंडा, डोक्यावर पिवळी टोपी आणि गळ्यात पिवळ्या रंगाचा दुपट्टा टाकून सहभागी झाले होते. त्यामुळे नागपूरचे रस्ते ओबीसीमय झाल्याचे दिसून येत आहे.

