नांदेड : प्रतिनिधी
धनेगाव येथील पेट्रोल पंपावर झालेल्या इंदरजितसिंग बलजितसिंग बावरी यांच्या खूनप्रकरणी फरार असलेल्या आणखी एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. अजय ऊर्फ अज्जू महेंद्र बिगानिया (रा. वाल्मिकी नगर, देगलूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे या गंभीर खूनप्रकरणात आतापर्यंत ६ आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत.
धनेगाव येथील पेट्रोल पंपावर ८ ऑगस्ट रोजी इंदरजितसिंग बावरी हे मोटारसायकलवर पेट्रोल भरण्यासाठी गेले असता, पूर्वीच्या वादातून आरोपींनी कट रचून त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या प्रकरणात नितीन बिगानिया, दिलीप डाकोरे, किन्ना परदेशी यांच्यासह अन्य आरोपींचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. घटनेनंतर काही आरोपी फरार झाले होते. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत होती. ११ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक फरार आरोपींच्या शोधासाठी गस्त घालत असताना गोपनीय बातमीदाराकडून अजय ऊर्फ अज्जू बिगानिया हा गोवर्धन घाट परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात शोध घेत संशयास्पदरीत्या फिरणा-्या इसमाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव अजय ऊर्फ अज्जू महेंद्र बिगानिया असल्याचे सांगितले.
स्थागुशाची कारवाई; आतापर्यंत ६ आरोपी ताब्यात
















