27.3 C
Latur
Thursday, February 27, 2025
Homeमहाराष्ट्रएमपीएससीकडून अवघ्या २०५ पदांची जाहिरात

एमपीएससीकडून अवघ्या २०५ पदांची जाहिरात

- बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम - पटोले संतापले

मुंबई : देशातील तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्याच्या मुद्यावरून विरोधी पक्षातील नेते केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत असतात. बेरोजगारीच्या मुद्यावर काँग्रेसकडून मोदी सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. यादरम्यान राज्यात देखील सरकारी नोक-यांमध्ये लाखो पदे रिक्त असताना फक्त २०५ पदांची जाहिरात प्रसिद्ध केल्याच्या मुद्यावर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धारेवर धरले आहे.

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी एमपीएससी करणा-या विद्यार्थ्यांचा मुद्दा मांडताना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. जाहिरातीमधून अनेक संवर्ग वगळल्याचा मुद्दा नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
नाना पटोले म्हणाले की, काल महाराष्ट्र राजपत्रित नागरी जाहिरात(२७४ पदे)प्रसिद्ध झाली परंतु सामान्य राज्यसेवामध्ये एकूण ३५ संवर्गांपैकी केवळ १२ संवर्गांची अत्यंत कमी पदांसह जाहिरात आली. डीसी, डीवायएसपी, सीओ, शिक्षणाधिकारी तहसीलदारसारखी पदे राज्यसेवेत असतात याचा सरकारला विसर पडला आहे का? असा सवाल नाना पटोले यांनी विचारला आहे.

लाखो पदे रिक्त असताना केवळ २०५ पदे म्हणजे बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम आहे. ताबडतोब सर्व ३५ संवर्गांचे सर्वसमावेशक मागणीपत्रक पाठवण्याचे निर्देश द्यावेत. स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मध्ये देखील ५ पैकी फक्त २ संवर्ग केवळ २६ पदांसह प्रसिद्ध केले. इतर ३ संवर्ग गायब करण्याचे कारणच काय? या सर्व तरुणांमध्ये प्रचंड रोष आहे त्यांनी बंड पुकारून रस्त्यावर उतरण्यापूर्वी सर्व विभागांना mpsc_office कडे त्वरित मागणीपत्रक पाठवण्याची कार्यवाही अपेक्षित आहे, असेही नाना पटोले म्हणाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR