सिडनी : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सिडनीमध्ये खेळवला जात आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. ऑस्ट्रेलियाने सुरुवातीचे दोन्ही कसोटी सामने मोठ्या फरकाने जिंकले आहेत.
ऑस्ट्रेलियाने पहिला सामना ३६० धावांनी जिंकला होता, याशिवाय दुसरा सामना ७९ धावांनी जिंकला होता. या मालिकेत आतापर्यंत पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू बाबर आझमची बॅट शांत आहे. बाबरच्या बॅटमधून एकदाही ५० पेक्षा जास्त धावा केलेल्या पाहायला मिळाल्या नाहीत. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर बाबरची खूप खिल्ली उडवली जात आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिस-या सामन्यातील पहिल्या डावात बाबर आझम बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. या मालिकेत बाबरची बॅट पूर्णपणे शांत झाली आहे, अशा परिस्थितीत त्याने चाहत्यांचा अपेक्षाभंग केला आहे. याबाबत सोशल मीडियावर चाहते बाबरची खिल्ली उडवत आहेत. बाबरबाबत अनेक मीम्सही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.