नवी दिल्ली : नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी म्हणाले ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. मे २०२५ मध्ये सुरू झालेल्या या ऑपरेशनदरम्यान भारतीय नौदलाने पाकिस्तानी नौदलाविरुद्ध मजबूत तैनाती केली. यामुळे पाकिस्तान नौदल आपली जहाजे बंदरांमधून बाहेर काढू शकले नाही आणि अरबी समुद्राजवळच्या मकरान किनारपट्टीपर्यंतच मर्यादित राहिले.
नौदल प्रमुखांनी सांगितले की गेल्या ७-८ महिन्यांपासून पश्चिम अरबी समुद्रात आमचे ऑपरेशन सातत्याने सुरू आहे. यामुळे पाकिस्तानकडे जाणा-या व्यापारी जहाजांचे मार्ग कमी झाले आहेत. त्यांची विमा रक्कम महाग झाली आहे. यामुळे शेजारील देशावर आर्थिक दबाव वाढला आहे. नौदल प्रमुखांनी मंगळवारी दिल्लीत नौदलाच्या वार्षिक पत्रकार परिषदेदरम्यान ही माहिती दिली.
४३,३०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त
अमली पदार्थांची तस्करी रोखण्याच्या मोहिमेत, नौदल युनिट्सने गेल्या वर्षी इतर राष्ट्रीय एजन्सींसोबत मिळून ४३,३०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. आम्ही पहिले प्रतिसादक म्हणून आमच्या जबाबदा-या अत्यंत प्रभावीपणे पार पाडत आहोत आणि आम्हाला याचा अभिमान आहे.
१२ युद्धनौकांचा समावेश
आम्ही एक पाणबुडी समाविष्ट केली आहे, ज्याला पंतप्रधानांनी १५ जानेवारी रोजी ट्राय-शिप कमिशनिंग कार्यक्रमादरम्यान कार्यान्वित केले होते. गेल्या नौदल दिनापासून १२ युद्धनौका समाविष्ट केल्या आहेत. आयएनएस उदयगिरी आमच्या युद्धनौका डिझाइन ब्युरोने तयार केली आहे. ही आमची १०० वी स्वदेशी युद्धनौका आहे.

