मुंबई: राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाला लागलेली मोठी गळती आता चव्हाट्यावर आली आहे. ठाकरे गटाचे ६ खासदार पक्षाचा व्हीप धुडकावून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झाले आहे. या बंडखोर खासदारांच्या यादीत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव सर्वात आघाडीवर असून, त्यांनी पक्ष सोडण्याच्या या मोठ्या निर्णयावर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडली आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या नेतृत्वावर, विशेषतः आदित्य ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.
आदित्य ठाकरेंनी अधिक सक्रिय राहायला हवे होते
मुलाखतीदरम्यान ओमराजे निंबाळकर यांनी महायुती सरकारच्या नेतृत्वाचे कौतुक करताना ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीवर अप्रत्यक्ष पण तीव्र नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सतत कार्यकर्त्यांमध्ये फिरतात आणि मेहनत घेतात, असे सांगत ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना आरोग्याच्या कारणांमुळे सातत्याने फिरणे शक्य नसले, तरी आदित्य ठाकरे यांनी अधिक सक्रिय राहायला हवे होते.
मोठ्या धर्मसंकटात; भावनिकदृष्ट्या चूक, पण राजकीयदृष्ट्या योग्य
पक्षांतराच्या निर्णयावर बोलताना ओमराजे काहीसे भावूक झाले. हा निर्णय भावनिक दृष्ट्या चुकीचा वाटत असला, तरी राजकीयदृष्ट्या तो योग्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वतःची माणसे निवडून येत नसतील, तर भविष्यात राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकते, अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिली. मतदारसंघात रस्ते, पूल आणि डीपी यांसारखी कामे करण्यासाठी वारंवार प्रस्ताव देऊनही कामे होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सत्तेत नसल्याने आणि निधी उपलब्ध नसल्याने लोकांची कामे करता येत नसल्याचे ते म्हणाले.
पैशांच्या आणि सुरक्षेच्या चर्चा खोट्या
पक्षांतरासाठी कोट्यवधी रुपये किंवा ‘वाय प्लस’ सुरक्षा मिळाल्याच्या चर्चांचा ओमराजे निंबाळकर यांनी कडक शब्दांत इन्कार केला. हा निर्णय केवळ मतदारसंघाच्या विकासासाठी असून, आपल्यावर शिंदेसेनेत प्रवेश करण्यासाठी कार्यकर्त्यांचा मोठा दबाव असल्याचे त्यांनी सांगितले.
अंतिम निर्णय २० जूननंतर
आपल्या भूमिकेचा अंतिम निर्णय कधी जाहीर होणार, याबाबत बोलताना ते म्हणाले की, त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाच्या कोर्टाच्या निकालानंतर, सर्व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून ते २० जूननंतर आपला अंतिम निर्णय जाहीर करतील.
















