Homeराष्ट्रीयओरॅकलने ३०००० कर्मचा-यांना कामावरून काढले

ओरॅकलने ३०००० कर्मचा-यांना कामावरून काढले

नवी दिल्ली : आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी ओरॅकलने भारतात मोठ्या प्रमाणावर नोकरकपात केल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीने भारतातील सुमारे १२,००० कर्मचा-यांना कामावरून कमी केल्याचा अंदाज असून पुढील एका महिन्यात आणखी नोकरकपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, कंपनीकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

विविध मीडिया रिपोर्ट्समध्ये केलेल्या दाव्यानुसार, ओरॅकलमध्ये भारतात सुमारे ३०,००० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी जवळपास १२,००० कर्मचा-यांना कामावरून कमी करण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, फक्त भारतच नाही, तर जागतिक स्तरावर कंपनीने सुमारे ३०,००० कर्मचा-यांना नाराळ दिल्याची माहिती आहे. हा आका कंपनीच्या एकूण कर्मचा-यांच्या सुमारे १८ टक्के आहे.

कंपनीचे कर्मचा-यांना ईमेल
मिळालेल्या माहितीनुसार ज्या कर्मचा-यांना कामावरून कमी केले, त्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये कंपनीने सांगितले की, कंपनीमध्ये संघटनात्मक बदल करण्यात येत असून ऑपरेशन्स अधिक कार्यक्षम करण्यासाठी काही पदे कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे काही कर्मचा-यांची पदे अनावश्यक ठरत असल्याचे कंपनीने मत आहे. दरम्यान, कामावरून कमी करण्यात आलेल्या कर्मचा-यांसाठी कंपनीने काही आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे.

स्वेच्छेने राजीनामा देणा-यांसाठी काय?
यामध्ये प्रत्येक पूर्ण सेवावर्षासाठी १५ दिवसांचा पगार, नोकरी संपेपर्यंत एक महिन्याचे वेतन, लीव्ह एन्कॅशमेंट, पात्रतेनुसार ग्रॅच्युइटी, एक महिन्याचा नोटीस पगार आणि अतिरिक्त दोन महिन्यांचा पगार (टॉप-अप) याचा समावेश आहे. मात्र, हे पॅकेज स्वेच्छेने राजीनामा देणा-या कर्मचा-यांनाच लागू असल्याचे सांगितले जात आहे.

एआय आणि डेटा सेंटर गुंतवणूक
ओरॅकल सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स(एआय) साठी मोठ्या प्रमाणावर डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी गुंतवणूक वाढवत आहे. त्याचबरोबर कंपनी आपला मुख्य डेटाबेस व्यवसायही मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. काही महिन्यांपूर्वी कंपनीने ओपन एआय सोबत ३०० अब्ज डॉलरपेक्षा मोठा करार केल्याची माहिती दिली होती. त्यानंतर कंपनीच्या मोठ्या प्रकल्पांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

आयटी क्षेत्रासाठी धोक्याची घंटा?
तज्ज्ञांच्या मते, एआय ऑटोमेशन, क्लाउड सर्व्हिसेस आणि खर्च कमी करण्याच्या धोरणामुळे मोठ्या आयटी कंपन्या कर्मचारी संख्या कमी करत आहेत. ओरॅकलमधील नोकरकपात ही आयटी क्षेत्रात येणा-या मोठ्या बदलांची सुरुवात मानली जात आहे. एआय आणि ऑटोमेशनमुळे पुढील काही वर्षांत आयटी क्षेत्रातील नोक-यांचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रातील कर्मचा-यांनी नवीन कौशल्ये शिकण्यावर भर देणे गरजेचे ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR